महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण प्रतिनिधी – फलटण तालुक्यातील बरड (ता. फलटण) गावचे सुपुत्र तथा भारतीय सैन्याच्या ११५ इंजिनिअर रेजिमेंटचे जवान नायक विकास विठ्ठलराव गावडे यांनी देशसेवेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिल्यानंतर संपूर्ण तालुक्यासह राज्यभरातून शोक व्यक्त केला जात आहे.
त्यांच्या वीरमरणाने गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या कुटुंबाला धीर देण्यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व नागरिक पुढे येत आहेत.याच पार्श्वभूमीवर माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी बरड येथे शहीद नायक विकास गावडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला.
दरम्यान माजी खासदार निंबाळकर यांनी शहीद जवानांची कन्या चि. श्रीशा हिच्या पुढील संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी आपण स्वतः घेणार असल्याची ठाम ग्वाही दिली. “श्रीशाच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही. तिच्या शिक्षणास सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,” असे त्यांनी सांगितले.
तसेच, गावडे कुटुंबीयांना भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण भासू देणार नाही, शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले. शहीद जवानाच्या कुटुंबास शासनस्तरावर मिळणाऱ्या मदतीसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करू, असेही त्यांनी नमूद केले.
या वेळी उपस्थित ग्रामस्थांनी आणि कुटुंबीयांनी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या या संवेदनशील व मानवतावादी भूमिकेबद्दल समाधान व्यक्त केले. देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानाच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संदेश या निमित्ताने समाजात गेला आहे.
शहीद नायक विकास विठ्ठलराव गावडे यांचे बलिदान कधीही विसरले जाणार नाही. त्यांच्या देशभक्तीला आणि शौर्याला संपूर्ण फलटण तालुक्याचा सलाम असून, त्यांच्या कुटुंबासाठी उभा राहणारा हा आधार समाजातील एकात्मतेचे व कृतज्ञतेचे प्रतीक ठरत आहे.

