तळमावले – गुढे रस्त्यावर चारचाकी गाडीने धडक देऊन फरफटत नेल्याने एका महिलेचे अपघाती निधन

ढेबेवाडी प्रतिनिधी-महेश जाधव:- तळमावले कडून गुढ्याकडे जात असताना एका पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून येणाऱ्या चार चाकी गाडी क्र. एम.एच.०३.डी.एक्स.०६१५ या गाडीने एका दांपत्यास जोराची धडक दिली. या अपघातात महिलेला चारचाकी गाडीने पुढील बंपरमध्ये अडकून फरफटत गेल्याने महिला मयत झाली असून संबंधित मयत झालेल्या महिलेचा पती गंभीर जखमी आहे.

याबाबत अपघाती मयत महिलेचा पती माणिक वारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माहिती अशी की, माणिक वारे व मयत कै. कविता (वय वर्षे ४२ हे मुळचे बत्तीस शिराळा (सांगली)) येथील मूळ रहिवाशी आहेत. ते कामानिमित्त या भागात आले होते व गुढे ता. पाटण येथे एका जवळच्या नातेवाईकाकडे राहत होते. काल मंगळवार दिनांक २० मे रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास माणिक वारे व अपघाती मयत कै.कविता तळमावल्याकडून गुढे याठिकाणी रस्त्याच्या डाव्या बाजूने जात होते.

पुढे एका पेट्रोल पंपाजवळ आलेले असताना पाठीमागून आलेल्या चारचाकी गाडी क्रमांक एम.एच.०३.डी.एक्स.०६१५ या गाडीने या दांपत्यास जोराची धडक दिली यामध्ये संबंधित मयत महिला कै. कविता वारे चारचाकी गाडीच्या पुढे बंपर व चाकामध्ये अडकल्या चालकाने बेजबाबदारपणे निष्काळजीने निर्दयीपणे त्यांना फरफटत सुमारे दीड किलोमीटर नेहुन शिबेवाडी (गुढे) येथे सोडून दिले.

एवढे अंतर फरफटत गेल्याने ती महिला मयत झाली. ढेबेवाडी पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली त्यावेळी ही महिला फरफटल्याने फारच गंभीर परिस्थिती झाली होती व ती मयत झाली होती असे पोलिसांनी सांगितले. महिलेचा पती माणिक वारे यांच्यावर कराड येथे दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

संबंधित चारचाकी गाडीची नंबर प्लेट पोलिसांना घटनास्थळी मिळाली असून यानुसार चारचाकी गाडीची माहिती मिळाली असून त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा मोबाईल नंबर स्विचऑफ येत आहे. अद्याप याप्रकरणी कोणासही अटक करण्यात आली नसून लवकरच संबंधित चार चाकी गाडी चालकास ताब्यात घेऊ अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

error: Content is protected !!