कराड – ढेबेवाडी व सणबुर- ढेबेवाडी मार्गावरील खड्डे देत आहेत अपघाताला आमंत्रण, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- ढेबेवाडी कडून कराडला जात असताना मंगल वस्त्रालय समोर कराड ढेबेवाडी मार्गावर व सणबूर – ढेबेवाडी रस्त्याच्या भिमनगरच्या पुढे मंद्रुळ कोळे कमानी समोरील वळणावर रस्त्याच्या मधोमध खड्डा पडल्याने दररोज या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना खड्डा चुकवताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे येथे अपघाताची स्थिती निर्माण झाली आहे बांधकाम विभागाचे अशा खंड्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे.

ढेबेवाडी विभागातील हे प्रमुख रस्ते असल्याने यावरती वाहनांची दिवस- रात्र वर्दळ ही खूप मोठ्या प्रमाणात असते. रस्त्याकडील नाले साफसफाई न झाल्याने नाले तुंबून त्या ठिकाणचे पाणी रस्त्यावर येत आहेत. मागील काही दिवसात संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने काही खड्ड्यांमध्ये पाणी साचून खोल खड्ड्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे.

खड्डा पडून खड्ड्यातील खडी रस्त्यावरती पसरत आहे त्यामुळे ये-जा करणाऱ्या दुचाकी स्वार खडीवरून घसरून अपघात होत आहेत. तर रात्रीच्या वेळी समोरून दुसऱ्या वाहनांच्या हेडलाइटचा उजेड डोळ्यावर आला की खड्डाच दिसत नसल्याने खड्ड्यात दुचाकी, चारचाकी वाहने आपटताना दिसत आहेत यामुळे हे खड्डे अपघातांला निमंत्रण देत आहेत.

पुढे मोठा खड्डा दिसत असल्याने खड्डा चुकवण्यासाठी गाडी इकडे घेऊ की तिकडे घेऊ, अशी अवस्था वाहन चालवणाऱ्यांची होत आहे. एखादी मोठी दुर्घटना होण्याअगोदर संबंधित बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे भरुन घ्यावे व वाहनधारकांबरोबरच प्रवासी वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी येथील नागरीक करत आहेत.

error: Content is protected !!