महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण | प्रतिनिधी
सन २०२६–२७ या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण हक्क अधिनियम, २००९ अंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के आरक्षित जागांवरील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत खाजगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे बंधनकारक आहे.
शिक्षण हक्क अधिनियमाच्या कलम १२(१)(क) नुसार पात्र शाळांनी आपल्या प्रवेशक्षमतेच्या २५ टक्के जागा दुर्बल व वंचित घटकातील बालकांसाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्यात आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.शाळा नोंदणी करताना शाळेची मान्यता, वर्गनिहाय जागांची माहिती, पायाभूत सुविधा तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती अचूकपणे ऑनलाईन भरावी लागणार आहे.
विहित मुदतीत नोंदणी न करणाऱ्या शाळांचा आरटीई २५% प्रवेश प्रक्रियेत समावेश करण्यात येणार नाही, असा इशाराही शिक्षण विभागाकडून देण्यात आला आहे.सदर प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांना अर्ज करण्यापूर्वी शाळांची नोंदणी पूर्ण होणे आवश्यक असून, नोंदणीनंतरच विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे संबंधित सर्व शाळांनी दिलेल्या कालमर्यादेत नोंदणीची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

