महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण प्रतिनिधी
दि. १३ जानेवारी २०२६ रोजी फलटण तालुक्यातील माजी सैनिकांच्या विविध अडीअडचणींबाबत तहसील कार्यालय येथे विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा सैनिक अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश डांगे व आमदार सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.या बैठकीदरम्यान माजी सैनिकांकडून एकूण २० तक्रारी मांडण्यात आल्या. त्यापैकी १३ तक्रारींचे जागीच निवारण करण्यात आले, ३ तक्रारी न्यायप्रविष्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आले, तर उर्वरित ४ तक्रारींसाठी संबंधित विभागांकडून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीस प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे व तुषार गुंजवटे, गटविकास अधिकारी बोंबले, शहर पोलीस निरीक्षक अरविंद काळे, ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप जगताप, वनविभागाचे आरएफओ निकिता बोटकर यांच्यासह विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
फलटण तालुक्यात प्रथमच माजी सैनिक व प्रशासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन त्यांच्या समस्या जागीच सोडविण्यात आल्याने माजी सैनिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच तालुक्यातील नागरिकांमध्येही आनंदाचे वातावरण असल्याचे मत यावेळी माजी सैनिकांनी व्यक्त केले.
यावेळी आमदार सचिन पाटील यांनी प्रशासनाला सूचना देताना सांगितले की, “देशासाठी सेवा बजावलेल्या माजी सैनिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. त्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहून तात्काळ निर्णय घ्यावेत. माजी सैनिकांना कचेरीत हेलपाटे मारावे लागू नयेत, याची जबाबदारी प्रशासनाची आहे.
”यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा सैनिक अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश डांगे म्हणाले की, “माजी सैनिकांच्या अडीअडचणी जागीच सोडवण्याचा प्रयत्न प्रशासनाने करावा. कोणतीही अडचण असल्यास माजी सैनिकांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा. सैनिक देशाच्या सीमेवर रात्रंदिवस कर्तव्य बजावतात, त्यामुळेच देशातील नागरिक सुरक्षित आहेत.”
फलटण तालुक्यात प्रथमच माजी सैनिक व सर्व संबंधित प्रशासकीय विभागांची संयुक्त बैठक घेऊन त्यांच्या समस्या थेट ऐकून तोडगा काढण्यात आल्याने माजी सैनिकांसह नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकारच्या बैठकांचा उपक्रम नियमितपणे राबवावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.बैठकीच्या शेवटी सातारा जिल्ह्यात मागील तीन दिवसांत वीरगती प्राप्त झालेल्या शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीताने बैठकीची सांगता करण्यात आली.

