महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
विक्रम विठ्ठल चोरमले
फलटण – फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथे घडलेली गणेश बाळू मदने यांची निर्घृण हत्या ही केवळ एका गरीब व्यक्तीची हत्या नसून, ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेवर झालेला थेट घाला आहे. शेतात मेहनत करणाऱ्या गरीब कुटुंबातील व्यक्तीवर वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला करून त्याचा बळी घेतला, ही घटना अत्यंत संतापजनक व लोकशाही व्यवस्थेला काळिमा फासणारी आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांनी या घटनेकडे केवळ ‘एक गुन्हा’ म्हणून न पाहता, समाजात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे मूळ उखडून टाकण्याची गरज आहे. आरोपींना या खून प्रकरणात कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. अन्यथा कायद्याचा धाक संपत चालल्याचा संदेश समाजात जाईल, याची जबाबदारी प्रशासन घेणार का? या प्रकरणाचा तपास फास्टट्रॅक न्यायालयात चालवून, मृत गणेश मदने यांच्या कुटुंबाला तात्काळ न्याय मिळवून देणे हे शासन व पोलिसांचे कर्तव्य आहे.
तपासात दिरंगाई, दुर्लक्ष किंवा ढिसाळपणा झाल्यास संपूर्ण रामोशी समाजासह जय मल्हार क्रांती संघटनेला रस्त्यावर उतरून न्यायासाठी संघर्ष करावा लागेल, हेही प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे.आज प्रश्न एकाचा नाही; उद्या कोणाचाही असू शकतो. ग्रामीण भागातील रामोशी समाजाच्या एका गरीब व्यक्तीचा जीव इतका स्वस्त झाला आहे का, असा सवाल या घटनेने पुन्हा एकदा उपस्थित केला आहे.दोषींना
कठोर शिक्षा मिळेपर्यंत हा विषय शांत होणार नाही. न्याय मिळालाच पाहिजे — आणि तो तात्काळ अशी मागणी रामोशी समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.

