फलटण:- सातारा जिल्ह्यातील नगर परिषदा व नगर पंचायती मधील मयत कर्मचारी वारसांची अनुकंपा धारक प्रतीक्षा यादीमध्ये भ्रष्टाचार झाला असून सदर प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे जयवंत राजकुमार राऊत यांनी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक समीर शेख व सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उपअधीक्षक राजेश वसंत वाघमारे यांच्याकडे केली आहे.
जयवंत राजकुमार राऊत यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सातारा जिल्ह्यातील नगर परिषदा व नगर पंचायती यांच्या मयत कर्मचारी वारसांची अनुकंपा तत्वावरील भरती करणे कमी नगरपरिषद प्रशासन शाखेतर्फे सर्व नगरपरिषदा, नगरपंचायती यांचे मार्फत अनुकंपाधारक यांचे प्रस्ताव मागविले होते. ते प्रस्ताव मागवीत असताना त्यातील काही त्रुटी पूर्तता करणे कामी सदर कार्यालयातील अधिकाऱ्यांनी अनुकंपाधारकांना संपर्क साधून आपल्या प्रस्तावात त्रुटी आहे आपण सुधारणा करा असे सांगितले. सर्व अनुकंपाधारक यांनी तिथे जाऊन विचारत होते काय त्रुटी आहे परंतु सदर अधिकारी फक्त एवढेच म्हणत होते की त्रुटी आहे, त्रुटी आहे तद्नंतर त्या कार्यालयातील गणेश चव्हाण, पाटील, व अजून काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी संगणमत करून अनुकंपाधारकांकडून प्रचंड प्रमाणात पैसे गोळा केले व तुम्हाला पाहिजे तिथे नियुक्ती ऑर्डर मिळेल सर्व त्रुटींची पूर्तता आमची आम्ही बघून घेऊ त्यासाठी आम्हाला काही रक्कम द्या असे म्हणून प्रत्येकी तिकडून पन्नास हजार ते एक लाखापर्यंत रक्कम घेतल्या.
सदर पैसे सर्व ऑफिसला साहेबांना देण्यासाठी लागणार आहेत असे सांगितले. हा आकडा साधारण 70 ते 80 लाख रुपये असा आहे गणेश चव्हाण व त्या कार्यालयातील कर्मचारी यांनी या सर्व बेकायदेशीररित्या गोळा केलेल्या रकमा याची चौकशी तात्काळ सुरू करावी ही चौकशी पूर्ण होईपर्यंत अनुकंपा धारकांच्या प्रतीक्षा यादी बाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात येऊ नये. तसेच गणेश चव्हाण यांचे जवळ असलेले अनुकंपाधारकांचे सर्व प्रस्ताव व त्यांच्या फाइल्स तात्काळ त्यांच्याकडून काढून घेण्यात यावेत त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा अनुकंपा धारकांचा कार्यभार देण्यात येऊ नये तसेच ज्या मुलांचे पैसे अडकले आहेत त्याची चौकशी करून गणेश चव्हाण यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत.
यामध्ये अजून कोणी अधिकारी कर्मचारी असल्यास त्यांच्यावरही तात्काळ कारवाई करावी.जोपर्यंत या प्रतीक्षा यादीतील अनुकंपाधारकांचा भ्रष्टाचाराचा निर्णय होत नाही तोपर्यंत कोणतेही अनुकंपाधारकांची प्रतीक्षा यादी लावण्यात येऊ नये कारण प्रचंड पैसे घेऊन सदर प्रतीक्षा यादीत खूप मोठा भ्रष्टाचार गणेश चव्हाण व त्यांच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी केला आहे त्यामुळे ही दोषपूर्ण असलेली, प्रचंड भ्रष्टाचाराने प्रतीक्षा क्रमांक चुकीची असलेली अनुकंपाधारकांची प्रतीक्षा यादी कोणत्याही परिस्थितीत लावण्यात येऊ नये असे केल्यास आपले विरुद्ध न्यायालयात मागण्यात येईल असे निवेदन जयवंत राजकुमार राऊत यांनी जिल्हाधिकारी सातारा, पोलीस अधीक्षक सातारा व उप अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांना दिले आहे.
सदर प्रकरणी आता सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून लुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांनी या प्रकरणी सखोल चौकशी केल्यास अनेक अधिकारी व कर्मचारी यांचे पितळ उघडे पडणार असल्याचे बोलले जात आहे.