न्यू इंग्लिश स्कूल सातारा चा शतकोत्तर रौप्य महोत्सवी वार्षिक क्रीडामेळावा -२०२४ उत्साहात संपन्न

सातारा:- शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या न्यू इंग्लिश स्कूल सातारा या शाळेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही क्रीडा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. ९ डिसेंबर पासूनच या क्रीडा सामन्यांची सुरुवात झाली होती. दररोज ७ व्या ,८व्या व ९व्या तासाला शाळेच्या मैदानावर सर्व मुलांसाठी क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.

इयत्ता ५वी मुले व मुली यांच्यासाठी कबड्डी, डॉजबॉल तसेच पोत्याची शर्यत इ.७ वी व ८ वी कबड्डी, डॉजबॉल ,फुटबॉल इ ९ वी व १० वी साठी कबड्डी ,डॉजबॉल, फुटबॉल रस्सीखेच इत्यादी सामने घेण्यात आले. वैयक्तिक खेळामध्ये सूर्यनमस्कार स्पर्धा तसेच बॅडमिंटन स्पर्धा ,५० मीटर व १०० मीटर धावणे स्पर्धा घेण्यात आल्या. दि.२३ डिसेंबर २०२४ या दिवशी क्रीडा मेळावा व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विजयराव पुरंदरे क्रीडा भारती केंद्रीय नियामक सदस्य व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, शाला समिती अध्यक्ष अमित कुलकर्णी, शाला समितीचे सदस्य सारंग कोल्हापुरे, शालाप्रमुखा सुजाता पाटील, उपशालाप्रमुखा विनया कुलकर्णी, पर्यवेक्षक . जनार्दन नाईक, श्रीमती अनिता कदम, राजेश सातपुते, क्रीडा मेळावा प्रमुख सुधाकर गुरव, उपप्रमुख घनःश्याम नवले, कार्याध्यक्ष श्रीनिवास कल्याणकर उपस्थित होते.

सर्वप्रथम विभाग राज्य तालुकास्तर क्रीडा स्पर्धेत सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी अमित मोरबाळे व विनायक काकडे यांच्या मार्गदर्शनाने पोवई नाका येथून क्रीडाजोत आणली. क्रीडा ज्योतीचे शाळेत आगमन झाल्यानंतर अध्यक्षांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर एनसीसी आर्मी, नेव्ही मुले व मुली यांच्यातर्फे मानवंदना देण्यात आली. मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तसेच प्रास्ताविक केले. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिके यामध्ये घुंगुर काठी ,डंबेल्स, करेल्स,रिंग कवायत, निशाण कवायत लेझीम, झांज तसेच कराटे व लाठीकाठी यांचा समावेश होता.यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळेतील विविध स्तरावर सुयश संपादन केलेल्या क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. इ.८वी अ वर्गातील विद्यार्थिनींनी तयार केलेल्या प्रवास ऑलिम्पिकचा या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.प्रमुख पाहुणे विजयराव पुरंदरे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणासोबतच आपल्या सुप्त गुणांना सुद्धा संधी दिली पाहिजे. तसेच आपण सर्वच गोष्टी आत्मसात करून त्यातील कोणत्यातरी एका गोष्टीत सुयश संपादन केले पाहिजे. पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील गुण ओळखून त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे व त्यांच्या सृजनशीलतेला वाव दिला पाहिजे असे सांगितले.

यानंतर शालेय समिती अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी शाळेच्या इतिहासातील १२५ वर्षांमध्ये विद्यार्थ्यांची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी सांगितली. सारंग कोल्हापूरे कुटुंबीयांच्या वतीने शालेय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यालाही मुला, मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, आणि या स्पर्धा अशाच पुढे सुरू ठेवणार असल्याची माहिती यावेळी सारंग कोल्हापुरे यांनी दिली.आभार प्रदर्शन उपकार्याध्यक्ष घनःश्याम नवले यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी ऑफिसर सीमा जोशी यांनी केले.

error: Content is protected !!