वाई:- डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या रमेश गरवारे स्कूलमध्ये नेहमीच नवनवीन उपक्रम राबविण्यात येत असतात. आपल्या संस्कृतीमध्ये ज्येष्ठांचे महत्त्व प्राचीन काळापासून वर्णन केले आहे. ज्येष्ठांचे महत्त्व व आजी आजोबांची माया मुलांशी असलेले बंध दृढ आणि वृद्धिंगत करते हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजावा हे प्रयोजन ठेवून शाळेत पूर्वप्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या आजी आणि आजोबांना निमंत्रित करण्यात आले होते.

याप्रसंगी आजी आणि आजोबांचे पाद्यपूजन करून त्यांच्यासाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले. डोळ्यांवर पट्टी बांधून नातवंडास ओळखणे, फुगे घेऊन अंतर पार करणे, अशा विविध प्रकारच्या खेळांमुळे कार्यक्रमास रंगत आली. आपले आजी आजोबा आपल्यासारखेच खेळत आहेत हे पाहून मुलांच्या उत्साहाला उधाण आले होते.

पालकांनी यावेळी आनंदाच्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका अपूर्वा कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठांचा आदर हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका अपूर्वा कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.पूर्वप्राथमिक विभागातील शिक्षक शिक्षकेतर साहाय्यक उपस्थित होते.