३६ वर्षांनी माजी शिक्षक व विद्यार्थी यांची भरली शाळा

खंडाळा:- गेट-टुगेदर, स्नेह मेळावा रामेश्वर विद्यालय विंग ता.खंडाळा जिल्हा सातारा. एस.एस.सी. सन १९८८-८९ बॅच चा दि. १२/०१/२०२५ रोजी रामेश्वर विद्यालयाच्या प्रांगणात अतिशय उल्हासात, संपन्न झाला.

३६ वर्षानंतर दहावीचे ते विद्यार्थी आज पन्नाशी पार करून एकत्र आले. त्यासाठी भव्य मंडप, आकर्षक रांगोळी, सुंदर मंच व्यवस्था, प्रसन्न, वातावरण व नेटके नियोजन यामुळे हा कार्यक्रम अतिशय रंगत गेला. या गेट-टुगेदर कार्यक्रमासाठी दहावीच्या बॅचला शिकवणारे मार्गदर्शक शिक्षकही, विद्यार्थ्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले होते. भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, ३६ वर्षानंतर भेटले आणि कोणाचा विश्वास बसेना की, आपण या विद्यार्थ्यांसोबत एकत्र शिकलो. उजळून आल्या आठवणी, छोटे झाल्यासारखे वाटू लागले.आला वसंत जेव्हा हलकीच शीळ आली, रंगीत पाखरांची उतरून ओळ आली.

भले बुरे ते घडून गेले ,विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसाऊ या वळणावर,या वळणावर…. अशीच काहीशी सर्वांची अवस्था होती.गेट-टुगेदर स्नेह मेळावा म्हणजे तरी नक्की काय ? आनंदाच्या आठवणी, मस्करीच्या आठवणी ,शिक्षेच्या आठवणी, शिक्षकांच्या आठवणी. या आठवणीतून ऋणानुबंध वृद्धिंगत करण्याची एक संधी म्हणजे हा स्नेह मेळावा. स्नेह मेळावा आपुलकीचा, स्नेहाचा, भेटीगाठीचा हा अविस्मरणीय सोहळा. शाळा म्हणजे एक आठवण, मनाच्या गाभाऱ्यात साठलेली . शाळा म्हणजे अनुभव,प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येणारा. शाळा म्हणजे एक मंदिर, यशाच्या शिखरावर नम्रतेची पूजा शिकवणारे. शाळा म्हणजे गुरु , पावलोपावली बळ देणारा,जगणं घडवणारा. शाळा म्हणजे शिस्त ,आयुष्याला वळण देणारी,जगण्याला अर्थ देणारी. शाळा म्हणजे माहेर पुन्हा पुन्हा यावेसे वाटणारे, शाळा म्हणजे गोड नाते बांधून ठेवणारे,शाळा म्हणजे एक साठवण मोज मजेची आनंदाची कधीही विसरता न येणारी.वर्गातील प्रत्येक कालवात मोती निर्माण करणारे गोताखोर म्हणजे आमचे गुरुवर्य.आदरणीय गुरुवर्य जाधव सर , शेंडे सर गायकवाड सर, मोरे सर, महामुनी सर,कवडे सर, खामकर सर, माळी सर ,डांगे सर या सर्वांनी शुभेच्छा दिल्या . सकाळ या सत्रात चहा नाष्टा स्वागत प्रत्येकाला प्रेरित करणारे होते.

शाळेच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आली त्यानंतर आदरणीय गुरुजनांना स्टेजवर विराजमान होण्यास निमंत्रित करून स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांना वंदन करून सरस्वती पूजन करण्यात आले . बॅचमधील मृत झालेले शिक्षक व सहकारी विद्यार्थी यांना आदरांजली व्यक्त करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्व गुरुजनांचे शाल, श्रीफळ, बुके व छतावरली माणसं हे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. बॅचमधील विद्यार्थ्यांच्या भाषणामध्ये सुधीर तळेकर यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सध्या मोहोळ हेमंत शेडगे यांनी विद्यार्थी मित्रांना मिस्किल कोपरखळ्या लगावल्या व बालपणीच्या आठवणी जागे केल्या. पोपटराव तांगडे गुरुजी यांनी आपल्या भाषणात गुरुजनाबद्दल भावना व्यक्त केल्या .

बालपणीच्या आठवणी व कालखंडात प्रत्येक जन घेऊन गेले. गुरुवर्य यांनी आपले मार्गदर्शन करताना त्या वेळच्या अनेक आठवणी व भविष्यातील दिशा याबद्दल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिश्चंद्र महांगरे गुरुजी यांनी अतिशय अफलातून केले व कार्यक्रमाचे रंगत वाढवली.आभार प्रदर्शन सुनील तिवाटणे गुरुजी यांनी केले तर वृत्त संकलनाचे कार्य या बॅचचे विद्यार्थी पोपटराव भिसे यांनी केले.दुपारचे सत्रात नियोजित ठरवलेल्या गाडीतून सर्वजण शिरवळ येथे जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी गेले. गाडीमध्ये खूप धमाल मस्ती गाण्यावर नृत्य यामुळ खूप गंमत झाली.

दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा सर्वजण एकत्र आले.यावेळी सर्वांनी आपापल्या आठवणी कथन केल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी नक्षलवाद्यांशी दिलेला सामना सांगताना अंगावर रोमांच उभे राहिले. फोटोसेशन करून पुन्हा एकदा कॉफी घेऊन आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमासाठी स्थानिक टीमने खूप मेहनत घेतली. आनंदाची उधळण करणारे असे क्षण मिळावे पुन्हा पुन्हा व्हावेत. असे प्रत्येकाला वाटू लागले. आजचा दिवस कसा संपला हे कोणालाही समजले नाही. जो तो आपुलकीने एकमेकांशी बोलायला तुटून पडले होते. एकमेकांचे विचार ऐकत ६ वाजले हे समजलेच नाही. काही लोक, २००/३०० की.मी. वरून आलेली होती त्यांना परतीचा प्रवास होता . आजचा आनंदाचा दिवस कोणीही विसरू शकत नाही.

error: Content is protected !!