वीर धरणावर परप्रांतीय मच्छीमारांचा ताबा, शासकीय अधिकाऱ्यांचा वरदहस्त

शिरवळ : – उजनी धरणापाठोपाठ आता वीर धरणावरही परप्रांतीय मच्छीमारांनी शासकीय अधिकाऱ्यांमार्फत पकड मिळवुन स्थानिक मच्छीमारांची उपासमार केली आहे. गेले कित्येक पिढ्या वीर धरणावर मासेमारी करून खंडाळा पुरंदर व भोर तालुक्यातील भोई,कोळी,कातकरी समाज उपजीविका करत आहे. येथील अनेक मच्छीमारांच्या जमिनी वीरधरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आहेत. हे मच्छिमार वीर धरणग्रस्त असून मासेमारी हा एकमेव जगण्याचा पर्याय आहे.

आता हे परप्रांतीय शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील स्थानिकांच्या मुळावर उठले आहेत. शासकीय अधिकाऱ्यांचा जीवावर या परप्रांतीयांनी ठेका मिळवून स्थानिक मच्छीमारांना रस्त्यावर आणले आहे. वीर धरणाच्या निर्मितीनंतर शेती व्यवसायासोबतच मासेमारी हा व्यवसाय जोमाने चालू होता. कित्येकांची केवळ मासेमारीवरच उपजीविका सुरू होती मात्र शासकीय ठेकेदारीमुळे ही उपजीविका बंद झाली आहे. सुधारित मासेमारीच्या नावाखाली राजकीय नेते,गुंड प्रवृत्तीच्या माणसांनी शासकीय यंत्रणेला हाताशी धरून वीर धरणामध्ये मासेमारीकरीता पाचारण केले आहे.

या परप्रांतीय मच्छीमारांकडून कमी दरात जास्तीचे मासेमारी करून स्वतःचा आर्थिक फायदा हे धनदांडगे करत आहेत. अनेक धनदांडगे यांनी प्रत्येक केंद्रावर उथळ पाण्याच्या ठिकाणी रोहू,कटला,मृगल,सायप्रणीस जातीच्या माशांची मासेमारी करून भरपूर फायदा मिळवला आहे. वीर धरणामध्ये परप्रांतीय बेसुमार मासेमारी करत असून त्यांच्या गुंडशाही मुळे स्थानिकांवर रस्त्यावर यायची वेळ आली आहे. वीर धरणाच्या निर्मितीनंतर प्रत्येक जिल्ह्यातील गावात एक मत्स्य संस्था याप्रमाणे पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांमध्ये 52 मत्स्य संस्था कार्यरत होत्या व शासनाकडून रोहू,कटला,मृगल जातीचे व लवकर वाढणारे मासे वीर धरणांमध्ये सोडले जात होते तसेच बँकेकडून सभासदांना कमी दराने कर्ज दिले जात होते.

नवीन होडी बांधल्यावर त्यावर सभासदांना जाळी,सूत,सायकल,फ्रिज इत्यादी आवश्यक वस्तू शासनाकडून मत्स्य संस्थांना दिल्या जात होत्या तसेच प्रत्येक मच्छीमाराकडून कर स्वरूपात डबा,ट्यूब,थर्माकोल या साधनांद्वारे मासेमारी करण्याकरता ५० रुपये तर होडीवरून मासेमारी करण्यासाठी महिन्याकाठी १०० रुपये याप्रमाणे शासनाकडून परवाना पास गोळा केला जात होता. परवाना पास गोळा करण्यासाठी त्या गावातील सभासदांना ते काम दिलेले होते त्यामुळे स्थानिक सुशिक्षित मत्स्यमारांना काम मिळाले.

वीर धरणामध्ये रोहू,कटला,खदरा,सायप्रनीस, मृ गल,कानस,मरळ,वाम,गुगळी,टाकर,कोळीस,शिवडा इत्यादी जातींचे मासे येथील मच्छीमारांना मोठ्या प्रमाणावर सापडत होते व याच मासळीचा बोलबाला खंडाळा,पुरंदर व भोर तालुक्यातच नव्हे तर पुणे,सातारा जिल्ह्यात कानाकोपऱ्यात पोहोचला होता. ठेकेदारी पद्धतीमुळे स्थानिक मच्छीमारांचे जनजीवन विस्कळीत झाल्या असून स्थानिक मच्छीमारांच्या जिवणाला जणूकाही सुरुंग लागला आहे.परप्रांतीय लोंढे दिवसेंदिवस वाढत गेले आहे.

स्थानिक मच्छीमारांना जागेवरच रोजगार उपलब्ध व्हावा असे शासकीय धोरण आहे. परप्रांतीयांना मासेमारी करायची झाल्यास त्यांना व्यवसाय विभागाची परवानगी घ्यावी लागते शिवाय ही परवानगी किचकट असून तसेच अर्ध्या किलोमीटरच्या आत मध्ये कोणालाही मासे पकडता येणार नाहीत असा शासनाचा नियम असताना देखील शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून बेसुमार परप्रांतीय मच्छिमार मत्स्य विभागाच्या आशीर्वाद आणि अर्थपूर्ण संबंधांमुळे वीर धरणामध्ये येऊन दाखल झाले आहेत व मत्स्यबीज, मत्स्यखाद्य मारत आहेत.वीर धरणातील गोड्या पानाचे क्षेत्र पुणे सातारा व सोलापूर अशा तीन जिल्ह्यात आहेत.

पिढ्यान पिढ्या मासेमारी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे, याच मासेमारी करणाऱ्या संस्थेचे भरलेली शासकीय रक्कम परत देऊन शासकीय नियम वेशीला टांगले असून ठेकेदारांना हाताशी धरून परप्रांतीयांनी सरकार केल्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांविरोधात लवकरच आंदोलन छेडणार असल्याचे अजिंक्य मच्छीमारी सहकारी संस्था भादे (होडी) ता.खंडाळा अध्यक्ष गणेश जाधव यांनी सांगितले.

error: Content is protected !!