शिरवळमध्ये गुटखा उद्योगावर शिरवळ पोलिसांचा छापा; सुमारे सव्वा कोटींचा साठा जप्त

शिरवळ : शिरवळ पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर हा छापा टाकण्यात आला. गोडाऊनची तपासणी करताना एक कोटी सहा लाख 19 हजार 270 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.शिरवळ येथील एका उच्चभ्रू सोसायटीतील एका गोडाऊनवर शिरवळ पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध गुटखा आणि पानमसाला साठ्याचा पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी गुटखा उत्पादनासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरली जात होती. या कारवाईमुळे परिसरात खळबळ झाली असून, नागरिकांमध्ये याची जोरदार चर्चा सुरू आहे.

शिरवळ पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर हा छापा टाकण्यात आला. गोडाऊनची तपासणी करताना एक कोटी सहा लाख 19 हजार 270 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये गुटखा उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामग्री आणि एक चारचाकी वाहन (किंमत: 4.50 लाख रुपये) देखील शिरवळ पोलिसांनी जप्त केले आहे. स्थानिक पोलिसांनी या कारवाईदरम्यान चार व्यक्तींना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. या मोठ्या कारवाईसाठी तब्बल १२ ते १५ तास लागले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.गुटखा निर्मिती आणि साठवणूक किती दिवसांपासून सुरू होती, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, या अवैध धंद्याच्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे.

महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही तो मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.या कारवाईसाठी सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिद, भगत ,पावरा , पोलीस अंमलदार सचिन वीर, तुषार कुंभार, भाऊसाहेब दिघे, अरविंद बाऱ्हाळे, अजित बोराटे, सुरज चव्हाण, तुषार अभंग, दीपक पालेपवाड, आणि अन्न-औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

error: Content is protected !!