ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- तुटके व गळके छप्पर, शेडमध्ये अस्वछता,बाकड्यांची झालेली दुरावस्था..तुटलेल्या खिडक्या,यामुळे तळमावले ता.पाटण येथील पिकअप शेड प्रवाशांसाठी असून अडचण आणि नसून खोळंबा बनले आहे. शहरीकरणाकडे वाटचाल सुरु असलेल्या तळमावले या ठिकाणची वर्षानुवर्षाची असणारी गैरसोय दूर होणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ढेबेवाडी – कराड मार्गावरील मुख्य रस्त्यावरील तळमावले बाजारपेठेचा झपाट्याने विस्तार आणि विकास सुरु आहे.या ठिकाणी शाळा,महाविद्यालय, बँका,पतसंस्था,शासकीय कार्यालय,दवाखाने यामुळे या बाजारपेठेची झपाट्याने वाढ होवू लागली आहे.या परिसरातील अनेक गावातील लोकांची या ठिकाणी दिवसभर मोठी वर्दळ सुरु असते.गेल्या काही वर्षापासून येथे अपार्टमेंट, व्यापारी संकुलन येथे झाली आहेत.तर काही कामे सुरू आहेत.

तळमावले गावाची शहरीकरणाकडे वाटचाल सुरु असताना काही महत्वाच्या सुविधा तशाच आहेत. यामध्ये महत्त्वाचा पिकअप शेडचा उल्लेख करावा लागेल.रस्त्यालगतच्या पिकअप शेडची दुर्दशा झाल्याने प्रवाशी,विद्यार्थी अक्षरशः रस्त्यावर ताटकळत उभे असतात.हे पिकअप शेड म्हणजे प्रवाशांना असून अडचण आणि नसून खोळंबा बनले आहे. सध्या या ठिकाणी प्रवाशांची ऊन,पावसात आश्रयासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही त्यामुळे उघड्यावरच आश्रय घ्यावा लागत आहे.

पिकअप शेडमधील गैरसोयीमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.पिकअप शेडच्या मागील बाजूला स्वच्छता गृह आहे त्याची येथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे.येथे थांबणा-या प्रवाशांना नाक मुठीत धरुन थांबावे लागते.

पावसाळ्यात तर फुटक्या पत्र्यामुळे शेडमध्ये साचलेल्या पाण्यातच थांबावे लागते. सबंधित विभागाने याची दखल घेऊन तत्काळ दुरुस्ती करावी अथवा आमदार व खासदार फंडातून याची दुरुस्ती अथवा नव्याने शेड उभारणी करण्यात यावी अशी नागरिकांच्यातून मागणी केली जात आहे.
येथील पिकअप शेडचा श्वास चोहोबाजूनी गुदमरला आहे.त्या ठिकाणी बसून वाहनांचा अंदाज येत नसल्याने ढेबेवाडी- कराड बाजूच्या दिशेने जाणारे प्रवाशी रस्त्याच्या दुर्तफा थाबतात.या ठिकाणी शाळा महाविद्यालयात सुटल्यानंतर येथे विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते.वडाप आणि खाजगी वाहनांचा गराडा असल्याने यातून प्रवाशांना मार्ग काढावा लागत आहे.