कु.अक्षता आबासाहेब ढेकळे या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडूला शिवछत्रपती राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार जाहिर

l महाराष्ट्र माझा l फलटण प्रतिनिधी l दि. १६ एप्रिल २०२५ l

वाखरी, ता. फलटण या छोट्या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेली कु.अक्षता आबासाहेब ढेकळे या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडूला महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा सर्वोच्च मानाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहिर झाला असून या घोषणेनंतर कु.अक्षता ढेकळे हिचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.३ लाख रुपये रोख, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे, क्रीडामंत्री दत्तमामा भरणे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा शासकीय नियोजित कार्यक्रम दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे आयोजित केला आहे. शिवछत्रपती हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार सुमारे ३० वर्षानंतर कु. अक्षता ढेकळे या गुणी खेळाडूच्या रुपाने हॉकीला मिळाला आहे.

कु. अक्षता आबासाहेब ढेकळे हिने मोठ्या मेहनतीने अल्पावधीत आंतरराष्ट्रीय हॉकी सुवर्ण कन्या असा नावलौकिक प्राप्त करीत भारतीय महिला हॉकी संघाचा दबदबा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण करण्यात मोठे योगदान दिले आहे.सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय हॉकी खेळाडू आणि वल्ड कप सिल्व्हर मेडल प्राप्त खेळाडू असा कु. अक्षता ढेकळे हिचा परिचय आहे. तिने आतापर्यंत साऊथ अमेरिका, नेदर ल्यांड्स,बेल्जियम, इंग्लंड, स्पेन, ओमान, साऊथ आफ्रिका, फ्रान्स वगैरे देशातील ९ आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत भारतीय संघातून खेळत भारतीय हॉकी ची उज्वल परंपरा जगासमोर ठेवली आहे.

कु. अक्षता ढेकळे ही आशिया कप गोल्ड मेडलिस्ट, वर्ल्ड कप सिल्व्हर मेडलिस्ट, राष्ट्रीय गोल्ड मेडलीस्ट असून तिने अल्पावधीत ९आंतरराष्ट्रीय, २४ राष्ट्रीय, १३ राज्यस्तरीय मेडल्स मिळविली आहेत. एकाच वर्षात सिनिअर व ज्युनिअर वल्ड कप मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारी पहिली महिला हॉकी खेळाडू आणि सर्वात कमी वयात सिनिअर वल्ड कप मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारी तरुण खेळाडू हा बहुमान मिळविण्यात कु. अक्षता ढेकळे यशस्वी झाली आहे.

error: Content is protected !!