महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण प्रतिनिधी – फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची दीर्घकाळापासूनची मागणी अखेर पूर्ण झाली असून, फलटण ते कुरवली बुद्रुक (दत्तनगर) या मार्गावरील नवीन बस सेवेचा शुभारंभ सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या बस सेवेमुळे कुरवली बुद्रुक, दत्तनगर व परिसरातील ग्रामस्थांना फलटण शहराशी थेट व सुलभ संपर्क उपलब्ध झाला आहे.या नव्या बस सेवेच्या प्रारंभामुळे विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, शिक्षण, आरोग्य, शासकीय कामकाज आणि दैनंदिन प्रवास अधिक सोयीचा होणार आहे. यापूर्वी या भागातील नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते, त्यामुळे खर्च आणि गैरसोयीचा सामना करावा लागत होता.
कार्यक्रमावेळी उपस्थित सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी सार्वजनिक वाहतूक सेवा अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले. ही बस सेवा सुरू झाल्यामुळे परिसरातील आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
या शुभारंभ प्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी आणि एस.टी. महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. बस सेवा सुरू केल्याबद्दल ग्रामस्थांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,आमदार सचिन पाटील,नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.

