जिल्हापरिषद / पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण प्रतिनिधी

जिल्हापरिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ बाबत राज्य निवडणूक आयोगाने मंगळवार दि. १३ जानेवारी २०२६ रोजी पत्रकार परिषदेत अधिकृतपणे निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या घोषणेनंतर जिल्हा व तालुका स्तरावर निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरू करण्यात आली असून त्याच अनुषंगाने फलटण तालुक्यात तहसील कार्यालय फलटण येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

जिल्हापरिषद / पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने बुधवार दि. १४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजता तहसील कार्यालय, फलटण येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत निवडणूक कार्यक्रमाची सविस्तर माहिती, आचारसंहिता अंमलबजावणी, मतदान केंद्रांची तयारी, मनुष्यबळ नियोजन, सुरक्षा व्यवस्था, मतदार याद्यांबाबतची स्थिती तसेच निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या यावर सविस्तर चर्चा होणार आहे.

सदर बैठकीस तहसील प्रशासन, पंचायत समितीचे अधिकारी, संबंधित विभागांचे प्रमुख, निवडणूक कामकाजाशी संबंधित कर्मचारी तसेच इतर निमंत्रित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततेत व कायदेशीर पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना या बैठकीत देण्यात येणार असल्याची माहिती सहा. निवडणूक निर्णय अधिकारी जि.प.पं.स.निवडणूक तथा डॉ. अभिजीत जाधव तहसिलदार फलटण यांनी दिली आहे.

दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवार व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राजकीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. प्रशासनाने नागरिकांना आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन केले असून कोणतीही आचारसंहिता भंगाची बाब निदर्शनास आल्यास तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

error: Content is protected !!