फलटण तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा; ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात

फलटण प्रतिनिधी :फलटण तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यासाठी ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी उपविभागीय अधिकारी विकास व्यवहारे यांना निवेदन दिले असून त्या निवेदनात फलटण तालुक्यातील पर्यटना विषयी सुधारणा करण्यासाठी काही मागण्या करण्यात आल्या आहेत.

उपविभागीय अधिकारी विकास व्यवहारे यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, फलटण तालुक्यात तीन धबधबे (वॉटर फॉल) आहेत. यातील दोन धबधबे हे धुमाळवाडी या ठिकाणी आहेत. धुमाळवाडी चे वैशिष्ट्य म्हणजे फळांचे गाव म्हणून ओळखले जाते. तसेच पाचकुंड व नऊकुंड नावाचे दोन मोठे धबधबे येथे आहेत. या ठिकाणी हजारो पर्यटक दरवर्षी भेट देतात. तसेच जावली गावाशेजारी एक मोठा धबधबा आहे. परंतु या ठिकाणी पूर्वी घनदाट जंगली व फळांची झाडे होती. ती जवळपास सर्व नष्ट झाल्यात जमा झाली आहेत. त्याठिकाणी काही वर्षांपासून काही शेतकऱ्यांनी जमिनी कसण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे धबधब्याला भेटी देणाऱ्या काही पर्यटकांकडून काही फळे तोडली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. या मोठ्या तिन्ही धबधब्यांकडे पर्यटन विभाग, वनविभाग व महाराष्ट्र सरकारने लक्ष दिले तर या तिन्ही ठिकाणी जर कोणी अतिक्रमण केले असल्यास त्या जमिनी वन विभाग व महाराष्ट्र सरकारने तात्काळ ताब्यात घ्याव्यात आणि अतिक्रमण नसल्यास त्या शेतकऱ्यांच्या फळझाडांना संरक्षण देऊन फळांचे गाव (धुमाळवाडी) व जावली गावातील धबधब्यांचा विकास करण्यात यावा. जेणेकरून गावकरी व पर्यटक यांच्यामध्ये भांडणे होणार नाहीत. पर्यटकांना वाहने व्यवस्थित लावता येतील व दोन्ही गावच्या नागरिकांना नवीन रोजगार निर्माण होईल. तसेच पर्यटकांचे संरक्षण होईल, होणारी गैरसोय दूर होईल,सर्वात महत्त्वाचे राज्यातून व देशातून या तिन्ही धबधब्यांना पाहण्यासाठी पर्यटक येथे येतील एवढे हे तिन्हीही धबधबे निसर्गाच्या कुशीत दडलेले आहेत. त्यांना पर्यटकांसाठी खुले करून राज्य पर्यटन स्थळ बनवण्यात यावे.

तसेच धुमाळवाडी पासून काहीच अंतरावर वारुगड व संतोषगड आहेत. याही किल्ल्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांचा वा किल्ल्यांच्या दुरुस्त्या केल्यास फलटण तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना मिळेल. तसेच फलटण पासून काहीच अंतरावर निंभोरे गाव आहे. त्या ठिकाणी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाची स्थापना केलेली आहे. जागेची कमतरता असल्याने सरकारने या गावात दोन ते दहा एकर जागा संपादित करून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक व प्रेरणाभूमी उभारण्यात यावी.फलटण हे महानुभव पंथांची दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते. म्हणजेच श्री. चक्रपाणी प्रभुंचे जन्मस्थान आहे. या मंदिराला लागूनच बालगंगा नदी गेली आहे. या नदीवरील पुलाची उंची फार कमी आहे. याच पुलावरून श्री राम रथ व घोड्याची यात्रा जाते. काही वेळा जास्तीचा पाऊस झाल्यास दोन्हीही यात्रांच्या मार्गां मध्ये बदल करावा लागतो.

त्यामुळे तात्काळ पाच ते सहा फूट उंचीचा पूल बांधण्याचे आदेश करावेत व परिसरात होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात यावे. फलटण-कोरेगाव क्षेत्रामध्ये शहरात व गावात ठिकठिकाणी सुलभ शौचालय उभारण्यात यावीत. तसेच राज्य व राष्ट्रीय महामार्गावर अलटून पालटून चार ते आठ किलोमीटर वर सुलभ शौचालय उभारून देशासाठी पायलेट प्रोजेक्ट निर्माण करावा.फलटण मधून जाणारी बानगंगा नदी आहे. या नदीचे रूपांतर गटारगंगेत झाले आहे. यातील सर्व घाण काढून स्वच्छ व निर्मळ करून नदीला सुरक्षा भिंती व बंधारे बांधावेत तसेच धरणाचे स्वच्छ पाणी सोडून फलटणकरांना व पर्यटकांसाठी बोटिंग चालू करण्यात यावी. नदीच्या शेजारी नागरिकांसाठी चौपाटी/खाऊ गल्ली तयार करण्यात यावी. या सर्व पर्यटन केंद्रांचा तात्काळ विकास केल्याने फलटणला पर्यटन क्षेत्रात विशेष स्थान मिळेल व काही प्रमाणात रोजगारही निर्माण होईल. त्यासाठी सर्व मान्यवरांना विनंती की, फलटणच्या पर्यटन विकासाला तात्काळ मदत करावी अशी मागणी फलटणमधील सामाजिक कार्यकर्त्या ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सोबत सहकारी अमर खंदारे उपस्थित होते.

error: Content is protected !!