ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- पाटण तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांची शेती पडूनच आहे. काही जणांनी पेरण्या केल्या असल्या तरी सतत पडणाऱ्या पावसामुळे ती पिके कुजण्याच्या वाटेवर आहेत या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

या प्रसंगी खा. उदयनराजे भोसले यांच्यासोबत पाटण तालुक्यातील विविध ठिकाणी पाहणी दौरा करण्यात आला. दौऱ्यात भाजपचे वरिष्ठ नेते सुनील काटकर, पाटण विधानसभा प्रमुख विक्रम बाबा पाटणकर, पाटण दक्षिण मंडल अध्यक्ष गणेश नाथाराम यादव, मंडल अध्यक्ष गणेश भिसे, मंडल अध्यक्ष रवी पाटील, तालुका विस्तारक शंकरराव पाटील, सुरेश वडार यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी स्थानिक प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सांगितले की, शेतकऱ्यांचे नुकसान हे त्यांच्या जीवनावर परिणाम करणारे आहे. अशा परिस्थितीत शासनाने तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. पंचनामे करताना कोणताही विलंब न होता संपूर्ण पारदर्शक पद्धतीने काम व्हावे.शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचे परिसरात स्वागत होत आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे लवकर पूर्ण करून मदतीचे वाटप लवकर व्हावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

