पुरंदर :- मांडकी (ता. पुरंदर) परिसरात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. (शनिवार दि.११) रोजी मांडकी येथील धुळोबा वस्ती येथील नारायण जगताप यांच्या घराजवळील गोठ्यातील गाईच्या वासरावर बिबट्याने हल्ला चढवून, वासरांस जखमी केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जगताप यांच्या गोठ्यात चार जनावरे बांधली होती. दरम्यान, शनिवारी सकाळी पाचच्या दरम्यान बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या कालवडीवर हल्ला केला. यावेळी जनावरांचा आवाज ऐकल्यानंतर, जगताप यांनी गोठ्याकडे धाव घेत आरडाओरडा केला त्यामुळे बिबट्याने धूम ठोकली. दरम्यान, बिबट्याने केलेल्या हल्ल्यात कालवड जखमी झाली आहे. या संदर्भातील माहिती पोलीस पाटील श्रीतेज जगताप यांनी वन विभागात दिली होती. यावेळी वनरक्षक पोपटराव कोळी व वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
