महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
निर्भीड, समाजाभिमुख पत्रकार, लेखक, कवी, विचारवंत आणि समीक्षक म्हणून ओळख असलेले प्रा. विकास शिंदे यांचा दि. १४ मार्च रोजी वाढदिवस साजरा होत आहे. त्या निमित्ताने विविध क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
लेखक, कवी, प्राध्यापक आणि पत्रकार अशी अनेक ओळखी आपल्या कार्यातून घडवणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. विकास शिंदे. फलटण तालुक्यात पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. इतकेच नव्हे तर परिसरात “लोकमत म्हणजे विकास शिंदे आणि विकास शिंदे म्हणजे लोकमत” असे समीकरणच निर्माण झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या समतावादी विचारधारेचा वारसा जपत समाजाभिमुख पत्रकारिता करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा. विकास शिंदे.गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात विविध नियतकालिके व दैनिकांसाठी लेखन केले आहे.
साप्ताहिक लोकजगर, विचार संगम, तसेच शिवसंदेश, स्थैर्य, एकतादर्शन आदी प्रकाशनांसाठी त्यांनी लेखन केले. शिवसंदेशचे संपादक कॉ. हरिभाऊ निंबाळकर यांनी बालवयातच त्यांना लेखनासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ, स्व. दिलीप रुद्रभटे, स्व. प्रा. रमेश आढाव, दिलीपसिंह भोसले आणि बबनराव क्षिरसागर यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले आहे. मागील तीन वर्षांपासून ते लोकमतचे फलटण प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.
पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून ती सत्यासाठीची अविरत लढाई आहे. सत्ता, समाज आणि संस्कृती यांच्याशी समांतर चालत सत्य मांडण्याचे कार्य त्यांनी निर्भीडपणे केले आहे. ते केवळ बातम्या देणारे पत्रकार नसून वास्तवाची जाणीव करून देणारे सजग लेखक, विचारवंत आणि संवेदनशील कवी म्हणूनही त्यांची ओळख आहे.आजच्या धावपळीच्या ‘ब्रेकिंग न्यूज’च्या युगातही त्यांनी समजून घेणारी आणि सत्याचा शोध घेणारी पत्रकारिता जपली आहे.
त्यांच्या लेखणीला धार आहे; परंतु त्या धारेला प्रामाणिकपणा आणि निष्पक्षतेची जोड असल्याने ती नेहमी समाजहितासाठीच वापरली गेली आहे. अनेक सामाजिक, राजकीय घडामोडी, निवडणुका, आंदोलनं आणि बदलत्या सत्तासमीकरणांचा त्यांनी सजगपणे अभ्यास करून ते लोकांपर्यंत पोहोचवले.सामान्य माणसाच्या प्रश्नांशी नाते जोडणे ही त्यांच्या पत्रकारितेची खरी ताकद आहे. समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांचे प्रश्न मांडताना त्यांची लेखणी अधिक प्रभावी होते.
भारतीय पत्रकार संघाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी पत्रकारांना दिशा देण्याचे आणि मार्गदर्शन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या लेखक, कवी, प्राध्यापक आणि पत्रकार प्रा. विकास शिंदे यांना वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून हार्दिक शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

