वाई : सातारा जिल्ह्यामधील वाई तालुक्यात असलेल्या रमेश गरवारे स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर उद्योग उत्कर्ष सामाजिक संस्था व रमेश गरवारे स्कूल, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक ७ मार्च २०२५ रोजी करण्यात आले.

हे शिबीर मिशन तेजस्विनीच्या उद्देशानुसार राबवण्यात आले असून या शिबिरात शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांसाठी विविध आरोग्य तपासण्या तसेच प्रतिबंधात्मक चाचण्यांचा समावेश करण्यात आला. शिबिरामध्ये सर्वांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली ज्यामध्ये रक्त तपासणीमध्ये CBC, थायरॉईड, लिव्हर फंक्शन टेस्ट, रीनल फंक्शन टेस्ट, मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी, लिपिड प्रोफाइल इत्यादींचा समावेश होता तसेच कर्करोग निदानासाठी मुख व स्तन तपासणी तसेच व्हिज्युअल इंस्पेक्शन विथ अॅसिटिक अॅसिड (VIA) चाचण्या देखील करण्यात आल्या.

शिबिरात संशयित क्षय (टीबी) रुग्णांची तपासणी देखील करण्यात आली. याशिवाय सर्वांसाठी नेत्र तपासणी करण्यात आली आणि सवलतीच्या दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात आले. शिबिरासाठी स्थानिक वैद्यकीय तज्ज्ञ व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग घेण्यात आला त्यामध्ये आरोग्य केंद्र मालतपुरच्या लॅब तज्ज्ञ सौ. वैशाली चोरगे, वाई ग्रामीण रुग्णालयाच्या सौ. चव्हाण, सौ. सीमा पिसाळ, श्री. रवी भिसे व श्री. राहुल राऊत उपस्थित होते. नेत्र तपासणीसाठी गोपालकृष्ण नेत्र चिकित्सालयाचे डॉ. शहाबाज शेख, कॅम्प समन्वयक सौ. श्रुतिका जाधवराव आणि परिचारिका करुणा सावंत उपस्थित होते.
कर्करोग तपासणीसाठी ओन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे ओन्कोलॉजी सल्लागार डॉ. अर्जुन शिंदे, डॉ. मनिषा मगर व श्री. सुरज साबळे यांनी त्यांच्या स्टाफसह सहभाग घेतला. सौ. दिपाली जाधव यांनी महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे महत्व पटवून दिले. अशा प्रकारच्या आरोग्य तपासण्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत असे मत उद्योग उत्कर्ष सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अभिषेक घागरे यांनी व्यक्त केले.
या शिबारात उद्योग उत्कर्ष सामाजिक संस्थेच्या योगा ट्रेनर सौ. तृप्ती गायकवाड यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व पटवून दिले. संस्थेने यापूर्वी वाईतील समर्थ विश्व कॉलनी, बावधन रोड, खानापूर व शेंदूरजणे गावामध्ये अशाच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते ज्याचा अनेक लोकांनी लाभ घेतला. या शिबिराच्या यशस्वी आयोजनामुळे लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचे महत्त्व अधोरेखित होते. या सकारात्मक प्रतिसादानंतर संस्थेने गावा-गावांत आरोग्य तपासणी शिबिरे राबविण्याचा संकल्प केला आहे व शाळेमध्ये शिबिराचे आयोजन करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अपूर्वा कुलकर्णी यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले