वाई : येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या रमेश गरवारे स्कूलमध्ये वार्षिक स्नहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील कौशल्य गुणांचे कौतुक आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी संमेलन आयोजित करण्यात आले होते.

२० डिसेंबर रोजी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाचे इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे कार्यक्रम सादर केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दिया गरवारे इबानेझ, व त्यांचे सुपुत्र एरिक आणि इव्हान इबानेझ उपस्थित होते. आपल्या भाषणात दिया गरवारे यांनी त्यांचे आजोबा आबासाहेब गरवारे,वडील रमेश गरवारे यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि दूरदृष्टी बद्दल अभिमान व्यक्त केला.
आपल्या जीवनात आपण ध्येय घेऊन पुढे गेलो, त्याचा पाठपुरावा करत राहिलो तर यश मिळते असे प्रतिपादन केले.याप्रसंगी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धातील पारितोषिके देण्यात आली. यावर्षीचे संमेलन ‘ फंटॅसी अँड फिक्शन ‘ या संकल्पनेवर आधारित असल्याने आनुषंगिक समूहनृत्ये, नाटिका सादर करण्यात आले. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांचे विविधगुणदर्शन दाखवणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. समूह नृत्यामधील विविधता आणि सादरीकरणातील वैविध्य यांमुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त होता.

याप्रसंगी प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रसिद्ध लेखक, कवी लक्ष्मीकांत रांजणे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री.सरस्वती पूजनाने दीपप्रज्वलनाने झाली. वार्षिक अहवाल शाळेच्या मुख्याध्यापिका अपूर्वा कुलकर्णी यांनी सादर केला. विद्यार्थ्यांना पारितोषिके वितरण करून विविधगुणदर्शन कार्यक्रम सादर करण्यात आला. याप्रसंगी रांजणे यांनी बदलत्या काळातील स्थितीबद्दल आपले विचार व्यक्त केले. वाचनाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय अनघा जोशी, रुपाली देसाई यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली साळी, स्नेहा पोळ, राधा कोंढाळकर,मनीषा माने यांनी केले. आभारप्रदर्शन देसाई आणि साळी यांनी केले. शाळा समितीचे अध्यक्ष नितीन पोरे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका अपूर्वा कुलकर्णी यांचे मार्गदर्शन संमेलनास लाभले. संमेलनाच्या दोन्ही दिवशी पालक प्रतिनिधी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. वंदे मातरम् राष्ट्रगानाने कार्यक्रमाची सांगता झाली.