गाडगे महाराज यांनी दीनदलित आणि पीडितांच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दिले: पत्रकार कुमार पवार

वाई :- गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दिले, असे उदगार पत्रकार कुमार पवार यांनी काढले. सामाजिक समरसता गतीविधी संयोजक पुण्यस्मरण समिती यांच्या वतीने किसनवीर चौक पुण्यस्मरण स्तंभ येथे संत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयाेजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दै. प्रभातचे वाई प्रतिनिधी कुमार पवार यांची प्रमुख उपस्थिती हाेती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.पवार पुढे म्हणाले, लोक प्रबोधनाचा एक भाग त्यांचे कीर्तन असायचे. सामाजिक रूढी आणि परंपरेच्या टीका त्यात असायच्या. त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले आणि स्वच्छता आणि चारित्र्याची शिकवण दिली. गाडगे महाराजांची गोरगरीब, दीनदलित ह्यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चटन करण्यासाठी तळमळ असायची आणि त्यासाठी हे कार्यशील होते. दीन, दुर्बळ, अनाथ, अपंगांची ते नेहमीच सेवा करत असत.संयोजक सुधीर सूर्यवंशी प्रास्ताविकात म्हणाले, संत गाडगेबाबा हे महान समाजसुधारक होते. लौकिक अर्थाने ते अशिक्षित असूनही चालते- बोलते विद्यापीठ होते. आपल्या किर्तनातून लोकभाषेत त्यांनी समाजप्रबोधन केले, असे विचार त्यांनी मांडले.प्रारंभी यशवंत लेले यांनी ” सामाजिक समरसता गीत” सादर केले. सौ. मनिषा ताई घैसास यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कुमार पवार यांचा परिचय करून दिला. सुधीर सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

यावेळी आवटे सर आणि संजय गायकवाड यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. सौ. मनिषाताईंनी सूत्रसंचालन केले आणि उपस्थितांचे आभार मानले. शेवटी सर्वांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमास सतीश शेंडे, सुधीर शिंदे, विवेक शिंदे, बिपिन वैराट, सतीश जेबले, शिवाजी वाडकर, अंगद राय, मंगेश सकटे, विजय जमदाडे, रवी लाखे, उमेश माने, प्रमोद दळवी, संजय दळवी, योगेंद्र चरेगावकर, ललित सपकाळ तसेच वाईकर नागरिक उपस्थित हाेते.

error: Content is protected !!