वाईत घरकुल लाभार्थ्यांचा जलसमाधीचा प्रयत्न, मोफत वाळूसाठीच आंदोलन चिघळण्याच्या वाटेवर

वाई प्रतिनिधी:- घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळत नसल्याने कृष्णा नदीमध्ये उतरून आंदोलन करण्यात येईल हा इशारा देऊन सुद्धा वाई महसूल प्रशासनाने वाळू संबंधी योग्य उपाय योजना राबवल्या नसल्यामुळे वाईत घरकुल लाभार्थ्यांनी जलसमाधीचा प्रयत्न केला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 5 मे 2025 रोजी वाई तहसील कार्यालया समोर प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांनी राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या मोफत वाळू संबंधित करण्यात आलेल्या आंदोलनानंतर वाईच्या महसूल प्रशासनाकडून सदर प्रश्न सुटेल अशी अपेक्षा होती. मात्र १३ तारखेला कृष्णा नदीमध्ये उतरून आंदोलन करण्यात येईल हा इशारा देऊन सुद्धा वाई महसूल प्रशासनाने वाळू संबंधी योग्य उपाय योजना राबवल्या नसल्यामुळे आज नाईलाजास्तव वाई तालुक्यातील शेकडो घरकुल लाभार्थ्यांना कृष्णा नदीपात्रामध्ये उतरून आंदोलन करावे लागेल.

या आंदोलनामध्ये महसूल प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली व आपल्या हक्काच्या वाळूसाठी मोठ्या संख्येने घरकुल लाभार्थी त्या ठिकाणी उपस्थित होते. कृष्णा नदीपात्रामध्ये उतरून आंदोलन केल्यानंतर सर्व घरकुल लाभार्थी युवा नेते स्वप्निल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली महागणपती मंदिर वाईपासून पदयात्रेने किसनवीर चौक मार्गे तहसीलदार कार्यालय या ठिकाणी पोचले.

सदर गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर वाईचे प्रांताधिकारी यांनी या घटनेची दखल घेत तातडीने वाई महसूल प्रशासनाला सूचना दिल्या व यासंबंधी एक समिती गठीत करून वाळू वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात यावी अन्यथा संबंधित वाळू निविदाधारक यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल अशा सूचना दिल्या त्यामुळे प्रांताधिकारी यांनी यामध्ये मध्यस्थी साधत वाई तालुक्यातील १८०० घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळण्यासंबंधी सकारात्मक पाऊल उचलले.त्यांच्या या निर्णयाचे सर्व घरकुल लाभार्थ्यांनी स्वागत केले मात्र आपण दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी महसूल प्रशासनाकडून झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये पुन्हा आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल अशी माहिती स्वप्नील गायकवाड यांनी दिली.

या आंदोलनासाठी संतोष तात्या गायकवाड, श्रीकांत निकाळजे,रुपेश मिसाळ, बाजीगर इनामदार, रघुनाथ शेलार, सुनील मांढरे, अमर वाघमारे,सुरेश भोसले, सुजाताई कांबळे, सिद्धार्थ कांबळे आदी पदाधिकारी व घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!