l महाराष्ट्र माझा l वाई प्रतिनिधी l दि.३ मे २०२५ l
वाई तालुक्यांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जी घरकुल मंजूर झाले आहेत त्यापैकी मिळालेल्या माहितीनुसार १०० लाभार्थ्यांना सुद्धा तालुक्यात वाळू मिळाली नाही. त्यामुळे त्यामुळे सोमवार दि. ५ रोजी या विरोधात तहसीलदार कार्यालय वाई या ठिकाणी घंटानाद आंदोलन करणार असल्याचे युवा नेते स्वप्निल गायकवाड जाहीर केले आहे.
युवा नेते स्वप्निल गायकवाड यांनी याबाबत प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले की, राज्य शासनाचा घरकुलधारकांना मोफत वाळू देण्यासाठी करण्यात आलेला शासन निर्णय हा बोगस व सर्वसामान्य घरकुलधारकांची दिशाभूल करून त्यांच्या भावनांशी खेळणारा ठरला आहे. राज्यातील लाखो नागरिकांना त्यांचे हक्काचे घर मिळावे म्हणून शासनाकडून मोठ्या प्रमाणात घरकुल मंजूर करण्यात आले व मंजूर करण्यात आलेल्या घरकुलांना शासनाकडून जो निधी देण्यात येतो त्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आली. यानंतर घरकुल मंजूर असणाऱ्या नागरिकांना मोफत ५ ब्रास वाळू देण्याचा शासन निर्णय राज्य शासनाकडून तयार करण्यात आला त्या अनुषंगाने महसूल प्रशासनाकडून योग्य ती प्रक्रिया राबवून संबंधित घरकुल लाभार्थ्यांच्या घरापर्यंत वाळू पोहोचवण्याचे प्रयत्न होणे अपेक्षित होते मात्र वास्तविक परिस्थिती फार वेगळी असल्याचे चित्र दिसून आले आहे.
ज्या घरकुल लाभार्थ्यांना वाळू हवी आहे त्यांनी त्यांच्या परिसरात असणाऱ्या ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून महा खनिज या संकेतस्थळावर आपली माहिती टाकून वाळू मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण केली. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधित घरकुल लाभार्थ्याला वाळू घेऊन जाण्यासाठी ऑनलाइन वाहन परवाना मिळतो. असे परवाने मिळून सुद्धा लगत असणाऱ्या वाळू डेपोंमध्ये वाळूच शिल्लक नसल्याची माहिती संबंधित वाळू डेपो चालवणाऱ्या ठेकेदारांकडून देण्यात आली. शासकीय नियमानुसार वाळू परवाना मिळाल्यानंतर १५ दिवसाच्या आत डेपो मधून वाळू घेऊन जाणे बंधनकारक आहे. मात्र १५ दिवस उलटून सुद्धा डेपोमध्ये वाळूच नाही.
अनेक घरकुल लाभार्थ्यांना तर ऑनलाईन वाळूचा स्टॉकच उपलब्ध नव्हता. ज्यामुळे त्यांना पास मिळाले नाहीत. ही सर्व माहिती संबंधित तहसीलदार व महसूल प्रशासन यांना माहिती असून सुद्धा घरकुल लाभार्थ्यांसाठी त्यांनी कसलेही प्रयत्न केले नसल्याचे दिसून येते. वाई तालुक्यांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जवळपास १८०० घरकुल मंजूर झाले आहेत त्यापैकी मिळालेल्या माहितीनुसार १०० लाभार्थ्यांना सुद्धा तालुक्यात वाळू मिळाली नाही. त्यामुळे मोफत वाळू देण्याचे राज्य शासनाचे धोरण हे फक्त कागदावरतीच शिल्लक राहिले आहे व राज्य शासनाला गोरगरिबांना मोफत वाळूच द्यायची नाही व ती मिळू नये यासाठी संपूर्ण तांत्रिक जबाबदारी ही महसूल प्रशासन व त्यांच्या संकेतस्थळानी घेतलेली आहे.
त्यामुळे सोमवार दि. ५/५/२५ रोजी या विरोधात तहसीलदार कार्यालय वाई या ठिकाणी तालुक्यातील सर्व घरकुल लाभार्थ्यांच्या माध्यमातून या शासनाला जाग आणण्यासाठी घंटा नाद आंदोलन करण्याचे आयोजन केले आहे. तालुक्यातील सर्व घरकुल लाभार्थ्यांनी या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने सकाळी ११ वा. उपस्थित राहावे व आपला अधिकार प्राप्त करण्यासाठीच्या या लढ्याला बळ द्यावे असे आव्हान युवा नेते स्वप्निल गायकवाड यांनी केले आहे.

