गरवारे टेकनिकल फायबर्स कंपनी, वाई येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

वाई : पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी जोपासताना गरवारे टेकनिकल फायबर्स कंपनी, वाई येथे दिनांक ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन अत्यंत उत्साही वातावरणात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.या विशेष उपक्रमाचा शुभारंभ कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट श्री. अरविंद कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.

या प्रसंगी श्री. अभिजीत जोशी, श्री. विवेक देशपांडे, श्री. युवराज थोरात, श्री. सचिन कुलकर्णी, श्री. चंद्रशेखर बदाणे व श्री. गजानन जाधव, कामगार संघटनेचे सेक्रटरी अर्जुन सावंत यांची प्रमुख उपस्थिती हाेती. या सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.यावर्षी पर्यावरण दिनाची टॅगलाइन “प्लास्टिक प्रदूषणावर मात करा” ही असल्याने, या विषयाशी सुसंगत उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कंपनीतील कामगार बंधू-भगिनींना जूट पिशव्यांचे वाटप करण्यात आले, तसेच स्थानिक १९ प्रकारच्या झाडांच्या बियांचे वाटप करून निसर्गसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.या उपक्रमांतर्गत १०० झाडांचे वृक्षारोपण तर ४०० झाडांचे वाटप करण्यात आले. याशिवाय “प्लास्टिक प्रदूषणावर मात कशी करावी?” या विषयावर माहितीपूर्ण कार्यशाळा घेण्यात आली. पर्यावरणविषयक उपक्रमांना जनतेचा अधिक चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी ‘सेल्फी विथ प्लांट पॉईंट’ तयार करण्यात आला होता, ज्यात सहभागी होणाऱ्यांनी आपल्या सहभागाचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले.

कार्यक्रमात चित्र रेखाटन स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, आणि ऑनलाईन क्विझ स्पर्धा अशा कल्पक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले. सहभागी कामगारांनी उत्तम प्रतिसाद देत आपली पर्यावरणविषयक जागरूकता व्यक्त केली.कार्यक्रमाच्या समारोपात पर्यावरण संरक्षणाची प्रतिज्ञा घेण्यात आली, ज्यात सहभागी अधिकारी आणि कामगारांनी पर्यावरण रक्षणासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला.या कार्यक्रमास कंपनीचे विविध विभागातील अधिकारी व मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत पर्यावरण दिनाच्या माध्यमातून निसर्गाशी नातं दृढ करत सामूहिक जबाबदारीची जाण ठसवली.गरवारे टेकनिकल फायबर्स कंपनीने राबविलेला हा उपक्रम सतत कृतीशील व जबाबदार पर्यावरणप्रेमी दृष्टिकोनाचा आदर्श ठरला.

error: Content is protected !!