वाई : वाई येथील गरवारे टेक्नीकल फायबर्स कंपनीच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला.गरवारे टेक्नीकल फायबर्स कंपनीच्या वतीने दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयाेजन करण्यात येते. या वर्षीही येथील श्रीनिवास मंगल कार्यालयात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंपनीचे प्रेसिडेंट विवेक कुलकर्णी, प्रमुख पाहुण्या म्हणुन तहसीलदार साेनाली मेटकरी-शिंदे, डाॅ. आशा बाबर डॉ. संध्या निकम, व्हाईस प्रेसिडेंट अरविंद कुलकर्णी, जनरल मॅनेजर युवराज थाेरात यांची प्रमुख उपस्थिती हाेती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व भारतमातेच्या मृर्तीस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी साेनाली मेटकरी-शिंदे म्हणाल्या, महिला दिन हा जगात मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. महिलांच्या आत्मसन्मानाचा दिवस, महिलांची ध्येय संकल्प आणि उद्दीष्टांची मनोकामना करण्याचा दिवस. या दिवशी महिलांना एक आत्मप्रेरणा मिळते. समाजात महिलांबद्दल आदराची भावना निर्माण करणे आणि त्यांना पुरुषांप्रमाणे समान अधिकार मिळवून देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. कंपनीमधील उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत मागणी आहे.

तसेच या कंपनीमध्ये ५० टक्के पेक्षा जास्त महिला काम करत आहेत. कंपनीमध्ये काम करणार्या जवळपास १२०० महिला आपल्या कुटुंबाला हातभार लावत असल्याने ही काैतुकास्पद बाब आहे. प्रेसिडेंट विवेक कुलकर्णी म्हणाले, महिलांची महत्त्वाची भूमिका ओळखून त्यांच्या योगदानाचे कौतुक करण्याची गरज आहे. शिक्षण, विज्ञान, राजकारण, क्रीडा, कला, व्यवसाय अशा प्रत्येक क्षेत्रात आज महिला आपल्या यशाची पताका फडकवत आहेत. या निमित्ताने आपण महिलांचा सन्मान करू आणि त्यांना समान हक्क आणि संधी देण्यासाठी काम केले पाहिजे.
महिला या केवळ घरापुरत्या मर्यादित नसून त्या शिक्षिका, डॉक्टर, शास्त्रज्ञ, नेते आणि उद्योजकही आहेत. त्यांच्या क्षमता समजून घेऊन त्यांना साथ दिली पाहिजे कारण त्यांच्याशिवाय समाज अपूर्ण आहे. महिला सक्षमीकरण ही प्रगतीशील समाजाची ओळख आहे. गरवारे कंपनीतर्फे सामाजिक बांधीलकीच्या नात्याने सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण व आरोग्य क्षेत्रात करीत असलेल्या विविध योजनाची माहिती दिली. तसेच कंपनी व्यवस्थापणतर्फे नारी शक्ती प्रती असलेली भावना व महिला सक्षमीकरण यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगीतले.
आजच्या समाजात स्त्रियांचे योगदान पुरुषांच्या बरोबरीने नाही, तर त्या पुरुषांच्याही पुढे गेल्या आहेत हे नाकारता येणार नाही. शिक्षण क्षेत्रापासून ते आरोग्य क्षेत्रापर्यंत अनेक क्षेत्रात महिलांनी विशेष योगदान दिले आहे. आज महिला भगिनी या सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत व त्यांच्या या योगदानाबद्दल कौतुकाची थाप देण्यास कंपनी व्यवस्थापन हे सदैव तत्पर असल्याचे ही त्यांनी सांगीतले . यावेळी डाॅ. आशा बाबर यांनी हृदयविकार या विषयी सखाेल मार्गदर्शन केले. हृदयविकाराचा झटका येण्याची लक्षणे, हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे, हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून काय करावे या विषयी सविस्तर माहिती दिली.
दिपाली सदाफुले व प्राजक्ता कानिटकर यांनी सुत्रसंचालन व परिचय करून दिला. जनरल मॅनेजर युवराज थाेरात यांनी प्रास्ताविक केले. कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट अरविंद कुलकर्णी यांनी आभार मानले.यावेळी हळदी, कुंकु समारंभ तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश ही करण्यात आला होता. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या महिलांच्यामधुन लकी ड्राॅ ने तीन विजेत्या महिलेला मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आली. तसेच वर्षभरामध्ये चांगले काम केल्याबद्दल प्रत्येक विभातील महिलांना गाैरविण्यात आले.यावेळी उपस्थित असणार्या सर्व महिलांना कंपनीच्यावतीने एक भेटवस्तू देण्यात आली.या कार्यक्रमास कंपनी व्यवस्थापनातील अधिकारी सचिन कुलकर्णी, महेंद्र रुद्ररपू, दिनेश अग्रवाल, बलजीतसिंग सैनी, चंद्रशेखर बदाने तसेच कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय म्हस्के, सेक्रेटरी अर्जून सावंत, अधिकारी वृंद तसेच ११०० हुन अधिक महिला कर्मचा-याचा सहभाग घेतला.