फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथे दोन रानगव्यांचा मुक्त संचार

फलटण प्रतिनीधी:- फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर परिसरातील दोन रानगवे मुक्त संचार करताना आढळून आले. गावातील काही ग्रामस्थांनी या दोन गव्याची छायाचित्रेही मोबाईलमध्ये काढली असून कधी नव्हे ते रानगवा अचानक दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

फलटण तालुक्यात विविध पक्षी व वन्यप्राण्यांचा मुक्त संचार आहे. रानडुकरे, बिबट्या, मुंगूस, मोर, वानर, रानमांजर यांसह विविध प्राणी तालुक्यात आढळून येतात. तालुक्यातील काही भागात सतत बिबट्याची दर्शनी ही नागरिकांना मिळत असते.फलटण तालुक्यात यापूर्वी गव्यांचा अधिवास ऐकिवात नाही असे ग्रामस्थांनी सांगितले. फलटण तालुक्यात दोन रान गाव्यांचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

वाठार निंबाळकर येथे दिनांक १४ रोजी आढळलेला गवा आपल्या कळपापासून भरकटला असण्याची शक्यता आहे. अचानक शेतात गवा दिसल्याने ग्रामस्थांनी फलटण वन विभागातील अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली असून वन विभागातील अधिकाऱ्यांनी तत्काळ याबाबत कर्मचाऱ्यांना उपयोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्राणी मानवी वस्तीत येतात तेव्हा गोंधळलेले, घाबरलेले असतात. गर्दी न करता त्यांना मोकळीक दिली तर वनविभाग योग्य ती कार्यवाही करून संबंधित प्राण्याला त्याच्या अधिवासाच्या ठिकाणी किंवा जवळच्या जंगलात सोडून देतात. गर्दीला रोखण्यात वन विभागाची भूमिकाही मोलाची असते.

रानगव्याची थोडक्यात माहिती

पश्चिम घाट परिसरात रानगवे सर्रास आढळतात. एका रानगव्याचं वजन साधारण 700-1000 किलो असू शकतं. आकारमान मोठं असलं तरी हा प्राणी लाजाळू असतो. रानगवा हा तृणभक्षी वन्यप्राणी आहे. बांबूची पानं, गवत खातो. बोव्हिड हे त्याचं मूळ कुळ. गायीगुरं, म्हशींचही हेच कुळ असतं. या कुळातला सगळ्यात मोठा प्राणी म्हणजे गवा.इंग्रजीत त्याला Indian Gaur किंवा Indian Bison असं म्हटलं जातं.

नर गव्याचं जसं वय वाढत जातं तसा तो काळ्या रंगाचा होतो तर मादी गव्याचा रंग तपकिरी असतो. पिल्लं पिवळसर रंगाची असतात. गवे साधारणत: कळपात वावरणारे असतात. ते निशाचर असतात.गव्याची घाणेंद्रियं तीक्ष्ण असतात. त्यामुळे वास तीव्रतेने कळतात मात्र ऐकण्याची क्षमता आणि दृष्टी तितकी सक्षम नसते. प्रचंड शरीर आणि वास ओळखण्याची हातोटी हे गव्याचं गुणवैशिष्ट्य असतं,पूर्ण वाढ झालेल्या गव्याचं वजन हजार किलोपर्यंत असू शकतं.

गव्याला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे पायांचा रंग. पायात मोजे घालावे तसा हा रंग असतो. त्याला स्टॉकिंग्ज म्हणतात. हा रंग गव्याला म्हशींपासून वेगळा करतो. नोव्हेंबर ते मार्च हा गव्यांचा प्रजननकाळ असतो.गवे सहसा माणसांवर हल्ले चढवत नाहीत. गव्यांमध्ये आपापसात मारामारी होतात पण मुद्दाम त्यांनी माणसावर हल्ला केला असं होत नाही.

error: Content is protected !!