महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क – पावसाने काहीसा ब्रेक घेतल्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली असून, उन्हाची तीव्रता आणि उकाडा त्रासदायक ठरत आहे. आज (ता. 18) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, हवामान खात्याने यासाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे.

राज्याच्या इतर भागांमध्येही विजांसह हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये येत्या 24 तासांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईत आकाश प्रामुख्याने ढगांनी आच्छादलेले राहणार असून, कमाल तापमान सुमारे 32 अंश सेल्सियस तर किमान तापमान सुमारे 26 अंश सेल्सियसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. कोकणातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून, अनेक भागांत जोरदार सरींची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

गुरुवारी (ता. 17) सकाळपर्यंतच्या 24 तासांच्या कालावधीत कोकण आणि घाटमाथ्याच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. मराठवाड्यात काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली असून, परभणी जिल्ह्यातील सेलू येथे राज्यातील सर्वाधिक 130 मिमी पाऊस झाला. लातूर, धाराशिव आणि जालना जिल्ह्यांमध्येही दमदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, विदर्भात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून, चंद्रपूर येथे राज्यातील सर्वोच्च 34.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. ब्रह्मपुरी, सोलापूर, जेऊर आणि धुळे येथेही कमाल तापमान 34 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदले गेले.

आज (ता. 18) सिंधुदुर्ग तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि दक्षिण मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड तसेच विदर्भातील अकोला व अमरावती जिल्ह्यांमध्ये वीजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.राज्याच्या उर्वरित भागांमध्येही काही निवडक ठिकाणी वीजांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद (धाराशिव), लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.