महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण : श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटण संचलित सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे आज सोमवार, दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी स्वर्गीय सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा सांगता समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती सविता सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), उपाध्यक्ष सी. एल. पवार, मानद सचिव डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), प्रमुख पाहुणे महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा फलटणचे अध्यक्ष रविंद्र बेडकीहाळ,‘सह्याद्रीची सावली’ पुस्तकाचे लेखक डॉ. अमर शेंड यांच्यासह नियामक मंडळाचे सदस्य व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच संस्थेच्या सर्व शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. यावेळी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री कै. ना. अजितदादा पवार यांचे अंगरक्षक तसेच श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, तरडगावचे माजी विद्यार्थी कै. विदीप जाधव यांच्या विमान अपघातातील दुःखद निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यानंतर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. ज्युनिअर कॉलेज कला शाखेच्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या ‘वेणूनाद’ या हस्तलिखिताचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.जन्मशताब्दी निमित्त संस्थास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक (इ. ३री ते ५वी), उच्च प्राथमिक (इ. ६वी ते ८वी), माध्यमिक-उच्च माध्यमिक (इ. ९वी ते १२वी) व महाविद्यालयीन अशा चार गटांत घेण्यात आल्या होत्या.
प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह, ‘सह्याद्रीची सावली’ पुस्तकाची प्रत व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.यानंतर वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या भाषणात डॉ.सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी सौ. वेणूताई चव्हाण यांच्या आदर्श जीवनकार्याचा आढावा घेतला व विद्यार्थ्यांचे लेखन संस्थेच्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध करण्याचा मानस व्यक्त केला.
रविंद्र बेडकीहाळ यांनी सौ. वेणूताईंच्या जीवनातील प्रेरणादायी पैलूंवर प्रकाश टाकत आजच्या पिढीला मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता जाधव, प्रास्ताविक प्रा. शितल घनवट, बक्षीस वितरण वाचन प्रा. रूपाली घोरपडे यांनी केले, तर आभार मंदाकिनी सोनवणे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्या विजया सुरवसे, पर्यवेक्षिका आरती भट्टड, प्रा. पंकज बोबडे यांनी मार्गदर्शन केले.

