
फलटण : २५५ फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस व महायुती चे अधिकृत उमेदवार सचिन कांबळे पाटील १७ हजारांचे मताधिक्य घेवून विजयी झाले आहेत. गत तीन वेळा आमदार असणारे दिपक चव्हाण यांचा त्यांनी एकतर्फी पराभव केल्याने धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे.
या निवडणूकीत सचिन पाटील यांना मिळालेली मते पहाता माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर याच्यावर फलटण कोरेगाव मतदार संघातील मतदारांनी विश्वास टाकत त्यांच्या पाठिशी मतदार संघ ठामपणे उभा असल्याचे स्पष्ट संकेत दिले. फलटण कोरेगाव मतदार संघात एकंदरीत मतदानाचा आढावा पहाता राजे गटाला आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे.
सकाळी साडे सात वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू झाल्या नंतर एकूण सव्वीस फेऱ्यात मतमोजणी पार पडली यातील प्रत्येक फेरीत सचिन पाटील यांनी थोडी थोडी आघाडी घेत आघाडी वाढवत नेली फलटण शहर व परिसरातून जवळ पास चार हजारांची आघाडी सचिन पाटील यांना मिळाल्या नंतर मात्र आघाडीत मोठी वाढ होत गेली ही आघाडी आमदार दिपक चव्हाण तोडू शकले नाहीत फक्त सातव्या फेरीत त्यांना साडे चारशे मतांची आघाडी घेता आली तरडगाव व परिसरातून त्यांना ही आघाडी मिळाली.
पहिल्या फेरीपासून सचिन पाटील छोट्या छोट्या मताधिक्याने मोठी आघाडी घेत होते. मतमोजणी परिसरात सचिन पाटील शेवट पर्यंत उपस्थित होते शांत संयमी राहत त्यांनी विजयाची खात्री असल्याचे कार्यकर्त्यांना सांगितले दीपक चव्हाण यांनी मात्र चौदाव्या फेरी नंतर मतमोजणी केंद्र सोडले.
रासप चे उमेदवार माजी खासदार रणजितसिंह गटासाठी डोकेदुखी ठरणार असे राजकीय विश्लेषक सांगत होते परंतू त्यांचा कोणताही प्रभाव निकालावर पडला नाही उलट रणजितसिंह गटाला कधीच न मिळणारी मते जी राजे गटाला मिळाली असती ती मते रासप उमेदवाराने घेतली चौथा उमेदवार असलेले प्रा रमेश आढाव यांना अपेक्षेप्रमाणे मते मिळाली नाहीत त्यामुळे जातीय समीकरणे या वेळी चालली नाहीत.