जाधववाडी बिरदेवनगर येथील श्री बिरदेव यात्रेदरम्यान जमाव व वाद्य वाजवण्यास, प्राण्याचा बळी देण्यास मनाई; उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा प्रतिबंधात्मक आदेश

२४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान निर्बंध; सार्वजनिक शांतता व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा निर्णय

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क | फलटण प्रतिनिधी

फलटण :फलटण तालुक्यातील जाधववाडी येथील श्री बिरदेव देवस्थानच्या अश्विन कोजागिरी पौर्णिमा यात्रेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी प्रियांका आंबेकर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

हा आदेश २४ ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत लागू राहणार असून, देवस्थानच्या आसपासच्या परिसरात एकत्र येण्यास तसेच वाद्य वाजविण्यास व प्राण्याचा बळी देण्यास मनाई करण्यात आली आहे.फलटण शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सादर केलेल्या पत्राच्या आधारे हा आदेश काढण्यात आला आहे.

संबंधित यात्रेस धनगर, माळी, रामोशी तसेच इतर समाजांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. यात्रेदरम्यान सुमारे ३,५०० ते ५,००० भाविक उपस्थित राहण्याची शक्यता प्रशासनाने नमूद केली आहे.पोलीस प्रशासनाने सादर केलेल्या अहवालानुसार, श्री बिरदेव देवस्थानच्या यात्रेच्या अनुषंगाने दोन गटांमध्ये यापूर्वी वाद झाले असून, त्यासंदर्भात फलटण शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल आहेत.

यात्रेच्या काळात दोन्ही गटांचे समर्थक मोठ्या संख्येने एकत्र आल्यास पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अशा वादाचे रूपांतर हाणामारी किंवा दंगलीत होऊन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याबरोबरच यात्रेसाठी आलेल्या भाविकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता आदेशात नमूद करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून २४, २५ आणि २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे.आदेशानुसार, श्री बिरदेव देवस्थान, बिरदेवनगर जाधववाडी, फलटण येथील यात्रेदरम्यान देवस्थानच्या आसपासच्या परिसरात एकत्र येण्यास अथवा वाद्य वाजविण्यास व प्राण्याचा बळी देण्यास मनाई करण्यात आली आहे.

उपविभागीय दंडाधिकारी प्रियांका आंबेकर यांनी २१ ऑक्टोबर २०२६ रोजी स्वाक्षरी करून हा आदेश जारी केला आहे. आदेशाची प्रत जिल्हाधिकारी, सातारा यांच्या फौजदारी शाखेला माहितीसाठी पाठविण्यात आली असून, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण, तहसीलदार फलटण आणि पोलीस निरीक्षक, फलटण शहर पोलीस ठाणे यांना माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आली आहे. श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टलाही आदेशाची प्रत देण्यात आली आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केल्या नंतर कोणीही अधिकृतपणे यात्रेसंबंधी चुकीच्या बातम्या पसरविल्या व भाविकांना चुकीचे आवाहन केल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!