महावितरणच्या विरोधात जनतेत नाराजी; फलटणमध्ये रोडलाईटच्या वेळेचा प्रश्न कायम

सायंकाळी ६.१० ते ६.१५ वाजता रोडलाईट सुरू करण्याची मागणी; स्मार्ट मीटरच्या वेळापत्रकात बदल करण्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांची गैरसोय

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण : फलटण नगरपरिषद हद्दीतील विविध ठिकाणच्या रोडलाईट विद्युत जोडण्यांसाठी महावितरणमार्फत स्वयंचलित स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. या मीटरच्या निर्धारित वेळापत्रकानुसार सायंकाळी ७.१५ वाजता रोडलाईट सुरू होतात, तर सकाळी ६:४५ वाजता बंद होतात. मात्र, सायंकाळी लवकर अंधार पडत असल्याने रोडलाईट सुरू होण्याच्या वेळेत बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे.

याबाबत फलटण नगरपरिषदेने महावितरणला पत्र देऊनही अद्याप कार्यवाही झाली नसल्याने हा प्रश्न कायम आहे.नगरपरिषदेने दिलेल्या पत्रात रोडलाईट सायंकाळी ६.१५ या वेळेत सुरू करावेत, तसेच सकाळी ६.१५ वाजता बंद करावेत, अशी मागणी केली आहे. त्यासाठी स्वयंचलित स्मार्ट मीटरच्या वेळापत्रकात आवश्यक तांत्रिक बदल करणे गरजेचे आहे. मात्र, नगरपरिषदेने स्पष्टपणे मागणी करूनही प्रत्यक्षात बदल करण्यात आलेला नसल्याने महावितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

सायंकाळच्या वेळी रस्त्यांवर पुरेसा प्रकाश असणे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. रोडलाईट उशिरा सुरू होत असल्याने वाहनचालक, पादचारी आणि कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे नगरपरिषदेच्या पत्राची दखल घेऊन महावितरणने तातडीने आवश्यक बदल करणे अपेक्षित आहे. नगरपरिषदेने पत्र दिल्यानंतरही कार्यवाही का झाली नाही आणि रोडलाईटच्या वेळापत्रकात बदल करण्यासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्मार्ट मीटरच्या निर्धारित वेळापत्रकामुळे नागरिकांची गैरसोय होत असेल, तर त्यावर तांत्रिक उपाययोजना करून स्थानिक गरजेनुसार वेळ निश्चित करणे आवश्यक आहे. त्यामुळे महावितरण प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन रोडलाईट सुरू आणि बंद करण्याच्या वेळेत बदल करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नगरपरिषदेच्या पत्रानंतरही कार्यवाही न झाल्याने आता महावितरण प्रशासन याबाबत नेमकी कोणती भूमिका घेणार आणि फलटणकरांना महावितरण कडून वेळेत रोडलाईटची सुविधा मिळणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!