फलटण प्रतिनिधी: फलटण तालुक्याच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान देणारे माजी आमदार स्व. डॉ. कृष्णचंद्र रघुनाथराव भोईटे यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या फलटण येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते स्व. डॉ. भोईटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याला उजाळा देत, फलटण तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याची आठवण काढली. सामाजिक बांधिलकी, लोकांशी असलेला जिव्हाळा आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे स्व.डॉ. भोईटे यांनी तालुक्याच्या राजकारणात वेगळी छाप निर्माण केली होती, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी राजेंद्र भोईटे, नगरसेवक अशोकराव जाधव, अॅड. नरसिंह निकम, राजाभाऊ नागटिळे, अॅड. अनिल फाळके यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी स्व. डॉ. कृष्णचंद्र भोईटे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याला कृतज्ञतेने अभिवादन केले.
स्व. डॉ. भोईटे यांनी आपल्या कार्यकाळात शिक्षण, सामाजिक कार्य आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत सातत्याने आवाज उठवत फलटणच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याची पुन्हा एकदा उजळणी करत उपस्थितांनी त्यांना आदरांजली वाहिली.

