डेक्कन चौकातील अतिक्रमण कारवाईला सात दिवसांची मुदत; सात दिवसात अतिक्रमण न हटवल्यास अतिक्रमणावर हातोडा

उपळेकर मंदिरासमोरील रस्त्यालगतच्या अतिक्रमणावर कारवाईसाठी नगरपरिषदेचे पथक दाखल; सात दिवसांत अतिक्रमण हटविण्याची संधी – अतिक्रमण विभागप्रमुख विनोद जाधव यांची माहिती

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण प्रतिनिधी : फलटण शहरातील डेक्कन चौक येथील उपळेकर मंदिरासमोरील रस्त्यालगत करण्यात आलेल्या अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी फलटण नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाचे पथक आज दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, प्रत्यक्ष कारवाई सुरू होण्यापूर्वीच संबंधित जागामालकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे सात दिवसांची लेखी मुदत मागितल्याने कारवाईला तूर्तास मुदत मिळाली आहे.

डेक्कन चौक हा शहरातील महत्त्वाचा वर्दळीचा परिसर असून उपळेकर मंदिरासमोरील रस्त्यालगत करण्यात आलेल्या अतिक्रमणाबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात होते. सार्वजनिक रस्त्यालगत अतिक्रमण झाल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची चर्चा असून, या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने संबंधित ठिकाणी कारवाईसाठी पाऊल उचलले.

आज नगरपरिषदेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर संबंधित जागामालकांनी अतिक्रमण हटविण्यासाठी स्वतःहून सात दिवसांची मुदत देण्याची लेखी विनंती केली. याबाबतची माहिती फलटण नगरपरिषदेचे अतिक्रमण विभागप्रमुख विनोद जाधव यांनी दिली.

आता या सात दिवसांच्या मुदतीत संबंधित जागामालक स्वतःहून अतिक्रमण न हटवल्यास अतिक्रमण कायम राहिल्यास नगरपरिषद प्रशासन पुढील कायदेशीर कार्यवाही करणार आहे.भविष्यातही फलटण शहरात अतिक्रमणावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण विभागप्रमुख विनोद जाधव यांनी दिली आहे.

error: Content is protected !!