कार्डच्या नावाखाली हप्त्याने वाहनचालक-मालक त्रस्त; परिवहन विभागाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह
भाग १
फलटण प्रतिनिधी | महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
फलटण तालुक्यात परिवहन विभागाशी संबंधित कार्ड प्रक्रियेच्या नावाखाली सुरू असलेल्या व्यवहारांबाबत वाहनचालक आणि वाहनमालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. “मामा-मामी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संबंधित व्यक्तींच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे तालुक्यातील वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
एजंटांमार्फत कथितरीत्या मासिक हप्त्याची रक्कम निश्चित करून हप्त्यांचे कार्ड तयार केले जात असल्याचे बोलले जात असून, २ हजार रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत रक्कम आकारली जात असल्याचे आरोप वाहनचालकांकडून केले जात आहेत. या कथित व्यवहारांमुळे हप्त्यांचा कार्ड प्रक्रियेच्या बाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
अवैध वाहतूक करणाऱ्यांना कार्ड कसे मिळते?
अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर परिवहन विभागाकडून कारवाई केली जाते का? नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना कार्ड प्रक्रियेतून कोणत्या आधारावर लाभ मिळतो? तसेच कथित मासिक हप्त्यांच्या माध्यमातून कारवाई होत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर नियमानुसार कारवाई होणे अपेक्षित आहे.
मात्र, नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांना एकीकडे कागदपत्रांसाठी कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करावी लागत असताना, दुसरीकडे कारवाई न करण्यासाठी कथित हप्त्यांच्या माध्यमातून मासिक कार्ड तयार होत असल्याच्या तक्रारीची बाब गंभीर मानली जाऊ शकते.
२ हजार ते ५ हजारांचा कथित मासिक हप्ता?
कार्ड प्रक्रियेच्या नावाखाली २ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत मासिक रक्कम हप्ता म्हणून घेतली जात असल्याचे आरोप पुढे येत आहेत.जर अशा प्रकारे नियमित आर्थिक व्यवहार होत असतील, तर या कथित व्यवहारांची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
कुणाकडून हफ्ते घेतले जातात ? किती घेतले जातात? ते कशा स्वरूपात घेतले जातात ?ते कोणापर्यंत पोहोचतात? याबाबत सविस्तर लवकरच माहिती उपलब्ध होणार आहे.याबाबत सविस्तर वृत्त जाहीर केले जाणार आहे जेणेकरून तालुक्यात सुरू असणारा भ्रष्टाचार उघड होईल.
परिवहन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
फलटण तालुक्यात कार्ड प्रक्रियेच्या नावाखाली नेमकी कोणती व्यवस्था कार्यरत आहे, संबंधित एजंटांना कोणते अधिकार देण्यात आले आहेत आणि कार्ड तयार करण्याची हि प्रक्रिया अधिकृत प्रक्रिया आहे का, याबाबत स्पष्टता असणे गरजेचे आहे. फलटण तालुक्यात अशा हप्त्यांच्या कार्डच्या नावाखाली लाखांची वसुली सुरू आहे.
एजंट व “मामा-मामी” यांची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. शासकीय कामकाज न करता शासकीय यंत्रणाचा अनधिकृत वापर करत काही जण फलटण तालुक्यातील वाहतूकदारांसमोर आर्थिक संकट निर्माण करत आहेत.
लाखोंच्या कमाईची चर्चा; चौकशीची मागणी
कार्ड प्रक्रियेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होत असल्याची चर्चा असून, या व्यवहारांची एकूण उलाढाल किती आहे, याची अधिकृत माहिती लवकरच उपलब्ध होणार आहे.
हप्ता कोणाकोणास पोहचतो, संबंधित कार्डांची संख्या, आकारले जाणारे शुल्क, कथित मासिक हप्त्यांची नोंद आणि एजंटांमार्फत होणाऱ्या व्यवहारांची तपासणी केल्यास या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर येऊ शकते.
वाहनचालकांना दिलासा मिळणार का?
फलटण तालुक्यातील वाहनचालक आणि वाहनमालकांना कार्ड प्रक्रियेच्या नावाखाली आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारींची परिवहन विभाग मंत्री व मुख्य सचिव यांनी यांची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे.
कथित मासिक हप्त्यांचे व्यवहार, हप्त्यांचे कार्ड तयार करण्याची प्रक्रिया आणि नियमबाह्य वाहतुकीशी संबंधित आरोपांची निष्पक्ष चौकशी करावी. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी व गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
कार्डच्या नावाखाली कथित हप्त्यांचा बाजार सुरू असल्याच्या आरोपांमुळे फलटण तालुक्यात चर्चा रंगली आहे. आता परिवहन विभाग या प्रकरणाची चौकशी करून वाहनचालकांना दिलासा देणार का, की “मामा-मामी”च्या कथित कारभाराकडे दुर्लक्ष केले जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
क्रमशः
टीप फलटण तालुक्यातील वाहतूकदार चालक व मालक यांना या हप्त्याच्या कार्डबाबत तक्रार असल्यास अथवा याबाबत माहिती असल्यास यांचे पुरावे आम्हास सादर करावेत संबंधितांचे नाव गोपनीय ठेवले जाईल. – महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

