महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण प्रतिनिधी : फलटण तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचा कारभार अनधिकृत कामगार व दलालांच्या ताब्यात गेल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाशी संबंधित अत्यंत महत्त्वाची कामे जसे की नवीन रेशनकार्ड मंजुरी, रेशनकार्ड दुरुस्ती, नाव समाविष्ट करणे किंवा कमी करणे, धान्य वितरणाशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी तसेच ऑनलाइन रेशनकार्ड प्रक्रिया ही अधिकृत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात अनेक खाजगी व्यक्ती ही कामे दलालांच्या मार्फत करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही व्यक्ती शासकीय कर्मचारी नसतानाही तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात बसून नागरिकांची कागदपत्रे तपासणे, अर्ज स्वीकारणे, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया करणे तसेच विविध कामांसाठी मार्गदर्शन करणे अशी कामे करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
त्यामुळे कार्यालयातील अधिकृत कामकाज आणि अनधिकृत हस्तक्षेप याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून संपूर्ण व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सदर परिसरात अनेक दलालांचा वावर वाढला असून दलालांच्या मार्फत स्वतःची कामे आर्थिक तडजोडीतून तत्काळ केली जात आहेत.
नागरिकांच्या मते, शासकीय कागदपत्रे आणि संवेदनशील माहिती अनधिकृत व्यक्तींच्या हातात जाणे हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे प्रकरण आहे. अशा प्रकारामुळे नागरिकांची वैयक्तिक माहिती गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोपही काही नागरिकांकडून करण्यात येत आहे.दरम्यान, तहसील प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून पुरवठा विभागात अनधिकृतरीत्या काम करणाऱ्या व्यक्तींवर व दलालांच्यावर कारवाई करावी आणि कार्यालयीन कामकाज केवळ अधिकृत अधिकारी व कर्मचाऱ्यांकडूनच पारदर्शकपणे व्हावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याची मागणी
फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेणार का? चालू अधिवेशनात तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाबाबत तारांकित प्रश्न उपस्थित करावा, अशी मागणी मतदारसंघातील नागरिकांकडून होत आहे. तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील कारभाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

