फलटण प्रतिनिधी : शिक्षण क्षेत्रात गेल्या दोन दशकांपासून उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या वडले, ता. फलटण येथील शेतकरी कुटुंबातील प्रिन्सिपल सौ. संजीवनी संपत सोनवलकर यांना बी द चेंज फाऊंडेशन चे वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य पुरस्कार 2026 या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बी द चेंज फाऊंडेशन आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2026 हा कार्यक्रम रविवार, दिनांक 25 ऑक्टोबर 2026 रोजी शिर्डी येथील साई पालखी निवारा येथे मोठ्या उत्साहात पार पडला.प्रसंगी अहिल्यानगर जिल्ह्यांचे चे सहायक धर्मादाय आयुक्त विशाल शेंडे, अभिनेत्री निवेदिता पगार, विश्र्वरूप इंटरनॅशनल चे बाबासाहेब कापे,सैनिक फेडरेशन नाशिक चे अरुण भंडारे, पंजाब नॅशनल बँकेचे निलेश घोडेचोर, अमृत रोहोम,बी दि चेंज फाउंडेशनचे अध्यक्ष मयूर ढोकचौळे,सचिव सौ.रचना ढोकचौळे उपस्थित होते.राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेले पुरस्कारर्थी,मान्यवर,पत्रकार आणि संबंधितांचे आप्तेष्ट उपस्थित होते.
प्रिन्सिपल सौ. संजीवनी सोनवलकर यांनी 20 वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहून अध्यापन व शैक्षणिक व्यवस्थापनात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांनी प्राथमिक शिक्षण आपटे प्रशाला,माध्यमिक शिक्षण नूतन मराठी विद्यालय पुणे,एस.पी. कॉलेज, पुणे येथून बी.एस्सी., शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, माळेगाव येथून बी.एड. तसेच पुणे विद्यापीठातून एम.ए., डी.एस.एम. शिक्षण पूर्ण केले आहे.
अभिनव इंग्लिश मिडीयम स्कूल, वडवाडी, ता.खंडाळा,जि.सातारा येथे प्रिन्सिपल म्हणून कार्यरत असताना त्यांनी शैक्षणिक गुणवत्तावाढीसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय काम केले. सध्या त्या महात्मा फुले विद्यानिकेतन शिक्षण संस्थेच्या गगनगिरी इंग्लिश मिडीयम स्कूल, संतोषनगर, कात्रज, पुणे येथे प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहेत.
विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना वाव देत त्यांच्यातील सर्जनशीलता विकसित व्हावी आणि बदलत्या काळातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ते सक्षम व्हावेत, या दृष्टिकोनातून सौ. सोनवलकर यांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. स्मार्ट क्लास, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, संगणक शिक्षण आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.
कृतीतून मूल्यशिक्षण, खेळ व सांस्कृतिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संघभावना व सर्जनशीलता विकसित करण्यासोबतच पर्यावरण संवर्धन व जनजागृतीवरही त्यांनी भर दिला आहे. सौ. सोनवलकर यांचे वडील विठ्ठल बाबुराव नरुटे सहायक पोलीस निरीक्षक होते.त्यांच्या आई स्वर्गीय कुसुम यांनी त्यांना उत्तम शिक्षण व संस्कार दिले.सौ सोनवलकर यांच्या कार्यामागे कुटुंबाची खंबीर साथ लाभली आहे.
त्यांचे पती संपत बाबुराव सोनवलकर यांनी सावित्रीबाई फुले अध्यापिका विद्यालय, नायगाव, ता. खंडाळा येथे अधिव्याख्याता म्हणून कार्य केले आहे. कन्या डॉ. प्राची सोनवलकर या BAMS असून चिरंजीव रोहन सोनवलकर हे अमेरिकेत इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. पतींकडून मिळालेली साथ व प्रोत्साहन आपल्या कार्यासाठी प्रेरणादायी ठरल्याचे सौ. सोनवलकर यांनी सांगितले.
सौ. संजीवनी सोनवलकर यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक रतन माळी, अध्यक्षा सौ. स्मिताताई वाघ, सचिव रविंद्र वाघ यांच्यासह संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
वडले ग्रामपंचायत आणि वडले विकास सोसायटीचे पदाधिकारी व सदस्य, ग्रामस्थ, सोनवलकर पाटील परिवार, सोनवलकर सरांचा मित्रपरिवार, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंकरराव सोनवलकर, सोनवलकर हॉस्पिटलचे डॉ. दत्तात्रय सोनवलकर यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय व विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
ग्रामीण भागातील सामान्य शेतकरी कुटुंबातून सुरु झालेली शैक्षणिक वाटचाल राज्यस्तरीय सन्मानापर्यंत पोहोचणे ही फलटणसाठी अभिमानाची बाब असून, सौ. सोनवलकर यांचा हा गौरव शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे.

