थकित वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण

फलटण – आखरी रस्ता, मंगळवार पेठ, फलटण येथे थकित वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण केल्या प्रकरणी व सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी चार जणांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महावितरण,विद्युत सहाय्यक, ऋषिकेश गंगाराम सोनवणे, (रा. पणदरे, ता. बारामती, जि. पुणे) यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार,फलटण शहर शाखा क्रमांक 1 महावितरण मध्ये विद्युत सहाय्यक या पदावर काम करत आहेत. दिनांक 12 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांच्या सोबतचा महावितरण मधील स्टाफ महावितरणचा सरकारी गणवेश परिधान करुन ओळखपत्र गळ्यात अडकवुन आर्यन काकडे, दिव्या डोईजडकर, तेजपाल भिसे, निलेश कणसे असे सर्वजण आखरी रस्ता, मंगळवार पेठ, फलटण ता फलटण जि सातारा येथे घरगुती विजबील थकबाकीदार मिनाज मजीर वेपारी (रा. आखरी रस्ता मंगळवार पेठ फलटण ता फलटण जि सातारा) यांच्या घरी त्यांचे थकीत विजबिल वसुली करण्यासाठी गेले होते.

सदर विज कनेक्शन हे बंद करुन त्यांचे शेजारी राहण्यास असणाऱ्या गणेश सुभाष इंगळे यांची थकबाकी असल्याने त्यांचेही विज कनेक्शन बंद करण्यासाठी फिर्यादी सोबत काम करणारा आर्यन काकडे हा त्यांचे घरावर चढला असता अगोदर वीज कनेक्शन कट केलेले मिनाज वेपारी यांनी त्यांचे दोन मुले अफान मजीर वेपारी व अफताप मजीद वेपारी यांना बोलावुन घेतले व त्यांनी येवुन फिर्यादी व त्यांच्या सोबत असलेले दिव्या डोईजडकर, तेजपाल भिसे, निलेश कणसे कर्मचारी यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. त्याचवेळी रमेश इंगळे व प्रेम इंगळे (प्रिन्स) दोन्ही (रा. आखरी रस्ता मंगळवार पेठ फलटण ता फलटण) हे दोघे तेथे आले व त्यांनी त्यांचे विज कनेक्शन कट करु नये म्हणुन त्यांचे घरावर विज कट करण्यासाठी गेलेल्या आर्यन काकडे यास दगडाने तसेच विटाचे तुकड्याने मारत होते.

त्यावेळी आर्यन काकडे हा त्याचे मोबाईलमध्ये व्हिडीओ काढत आहे हे पाहुन रमेश इंगळे हा घरावर गेला तेथे त्याचेत व आर्यन काकडे यांचेत धक्काबुक्की करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यावेळी फिर्यादी यांनी वरिष्ठ फलटण शहर शाखा क्रमांक 1 चे सहाय्यक अभियंता दिनेश जोनवाल यांना फोन करुन सदर प्रकार सांगितला ते तात्काळ तेथे आले.

त्यानंतर त्यांनी सदर लोकांना समजावुन सांगितले व तेथुन घडलेल्या प्रकाराबाबत फिर्यादी तक्रार देण्यासाठी फलटण शहर पोलिस ठाणे येथे आले. याप्रकरणी 1) अफान मजीर वेपारी 2) अफताप मजीद वेपारी 3) रमेश इंगळे (पुर्ण नाव माहीत नाही) 4) प्रेम इंगळे (प्रिन्स) (पुर्ण नाव नाहीत नाही) याच्या विरोधात धक्काबुक्की करुन शिवीगाळ, दमदाटी केल्या प्रकरणी व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलिस गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

error: Content is protected !!