फलटणमध्ये कवडे क्लासेसमध्ये पाचवीतील विद्यार्थ्याला मारहाण; शिक्षिकेसह विद्यार्थ्यांच्या विरोधात तक्रार

सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून जप्त, मुलावर बारामती येथे उपचार

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण प्रतिनिधी : फलटण तालुक्यातील कोळकी येथील खासगी कवडे क्लासेसमध्ये इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. क्लासमधील शिक्षिकेने काठी, हात आणि झाडूने मारहाण केल्याचा, तसेच नववी-दहावीतील काही विद्यार्थ्यांना सांगून त्याच्यावर मारहाण करवून घेतल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, क्लासमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले आहे.

या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मारहाण झालेल्या मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार यांच्या मुलाचा दाखला कवडे क्लासचे मारुती कवडे यांच्याकडे देण्यात आला होता त्यांनी यशवंतराव चव्हाण हायस्कूल फलटण येथे पाचवी मध्ये प्रवेश घेतला आहे परंतु तो कवडे क्लास कोळकी येथे नियमित जात होता. १७ ऑक्टोबर रोजी क्लासमध्ये खेळण्याच्या कारणावरून शिक्षिका अश्विनी माने यांनी मुलाला काठीने व हाताने मारहाण केल्याचे मुलाने घरी सांगितल्याचे वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

याशिवाय नववी-दहावीतील काही विद्यार्थ्यांना बोलावून त्याला मारहाण करण्यास सांगितल्याचाही आरोप करण्यात आला आहे.२० ऑक्टोबर रोजी मुलगा आंघोळ करत असताना त्याच्या पाठीवर व पायांवर लाल-काळे व्रण दिसून आले. त्यानंतर वडिलांनी मुलाकडे विचारणा केली असता क्लासमध्ये झालेल्या कथित मारहाणीचा प्रकार समोर आल्याचे त्यांनी सांगितले. मुलाच्या शरीरावर व्रण दिसल्यानंतर वडिलांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला.

२१ ऑक्टोबर रोजी ते मुलाला घेऊन फलटण शहर पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर मुलाला फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारांसाठी त्याला बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. उपचारानंतर मुलाची प्रकृती ठीक असल्याचे वडिलांनी सांगितले.या प्रकरणात क्लासमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले आहे. या फुटेजमध्ये कथित मारहाणीची नोंद असल्याचे सांगण्यात येत आहे.

सीसीटीव्ही फुटेजसह वैद्यकीय कागदपत्रे, मुलाचा जबाब आणि इतर संबंधित व्यक्तींचे जबाब यांची पडताळणी महत्त्वाची ठरणार आहे. शिक्षिका अश्विनी माने यांच्यासह कथित मारहाणीत सहभागी असल्याचा आरोप असलेल्या विद्यार्थ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी वडिलांनी केली आहे.दरम्यान, २२ ऑक्टोबर रोजी क्लासेसचे संचालक मारुती कवडे हे सकाळी सुमारे ११.४५ वाजता घरी आले होते.

मुलाला यापुढे क्लासला पाठवायचे नसल्याचे स्पष्ट सांगितले असतानाही पूर्वपरवानगीशिवाय त्याला क्लासमध्ये नेण्यात आल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. त्यानंतर दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या मदतीने मुलाला क्लासमधून घरी आणल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेबाबतही संबंधित व्यक्तींची भूमिका आणि घटनाक्रम तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे.

सदर प्रकरणी वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात शिक्षिका अश्विनी माने व मारहाण करणारी मुले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन विद्यार्थ्याला शिकवणी वर्गात मारहाण झाल्याचा आरोप गंभीर असून, या प्रकरणामुळे खासगी क्लासमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि पालकांच्या विश्वासाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी असलेल्या ठिकाणी त्यांना सुरक्षित वातावरण मिळणे आवश्यक आहे.

error: Content is protected !!