महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
वाई : येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या रमेश गरवारे स्कूलमध्ये नोव्हेंबरच्या उत्तरार्धात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
शालेय जीवनात विद्यार्थी आणि खेळ यांचे नाते अतूट असते. यश अपयश, कधी विजयाचा उत्साह तर कधी हरण्याची निराशा या भावनांचा मेळ बसवणे खेळामुळेच शक्य होते. खेळ केवळ शरीरच तंदुरुस्त ठेवत नाहीत तर मनाचीही मशागत करतात. विद्यार्थ्यांनी खिलाडू वृत्ती आणि शिस्तशीरपणा हे गुण आत्मसात करावेत या हेतूने २४ नोव्हेंबर पासून २८ नोव्हेंबर पर्यंत पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकाराच्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
पूर्वप्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी धावणे, लिंबू चमचा, उलटे चालण्याची शर्यत, बॉल इन बकेट, बुक बॅलेन्सिंग या स्पर्धांचे आयोजन केले. प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी धावणे, अडथळा शर्यत, थाळीफेक, गोळाफेक, खो – खो, कबड्डी, इत्यादी क्रीडा प्रकार आयोजित केले होते. माध्यमिक विभागात धावणे, साखळी शर्यत, स्लो सायकलिंग, व्हॉलिबॉल, क्रिकेट अशा विविध खेळांचे सामने खेळवण्यात आले. शाळेच्या मैदानावर सकाळी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह होता. पालकांसाठी देखील विविध प्रकाराच्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. धावणे, रस्सीखेच, बॉल इन बकेट, डोजबॉल अशा खेळात पालकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. क्रीडा सामन्यातील पदक व प्रशस्तीपत्र वितरण प्रमुख पाहुणे क्रीडाभारती महाबळेश्वर विभागाच्या अध्यक्षा स्वप्ना केळकर केले. क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन स्वप्ना केळकर यांनी केले. त्यानंतर वैयक्तिक आणि सांघिक पारितोषिके वितरित करण्यात आली.
स्वतः उत्कृष्ट खेळाडू असल्याने स्वप्ना केळकर यांनी खेळाचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका अपूर्वा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. खेळाने वाढणाऱ्या ऊर्जेचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा जोशी यांनी केले. बक्षिसांचे वाचन सुषमा जाधव, संध्या दुडे आणि मनिषा माने यांनी केले.
आभार प्रदर्शन स्नेहा पोळ यांनी केले. क्रीडा सप्ताह यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अपूर्वा कुलकर्णी आणि शाळा समितीचे अध्यक्ष नितीन पोरे यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. क्रीडा शिक्षिका सुनीता शिर्के यांनी संपूर्ण क्रीडा सप्ताहाचे नियोजन केले. शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे साहाय्य झाले.

