राज्यभर छापे टाकण्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आदेश
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
लखनौ : चायनीज मांजामुळे वारंवार होणाऱ्या अपघातांमध्ये निष्पाप नागरिकांचा मृत्यू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. आता चायनीज मांजामुळे कोणाचाही मृत्यू झाल्यास तो थेट हत्येचा गुन्हा मानला जाईल आणि संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल केला जाईल, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यभरात चायनीज मांजाचा व्यापार, साठवणूक व वापर करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
संपूर्ण राज्यात चायनीज मांजावर बंदी
उत्तर प्रदेश सरकारने संपूर्ण राज्यात चायनीज मांजावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. बंदी असूनही हा धारदार मांजा बाजारात कसा उपलब्ध होत आहे, तो कोण विकत आहे आणि कोण वापरत आहे, याची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.चायनीज मांजाची विक्री, साठवणूक व वाहतूक रोखण्यासाठी राज्यभरात विशेष मोहीम राबवली जाणार असून, यासाठी पोलिसांना सखोल छापे टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोषी आढळणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.
‘मृत्यू झाला तर तो खूनच’ – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “चायनीज मांजामुळे होणारा कोणताही मृत्यू हा अपघात नाही, तर तो खून मानला जाईल. अशा प्रकरणांत दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा दिली जाईल.
कोणत्याही पातळीवर निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही.”या राज्यव्यापी मोहिमेचा नियमितपणे उच्चस्तरीय आढावा घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चायनीज मांजामुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत मुख्यमंत्री स्पष्टपणे नाराजी व्यक्त करत असून, बंदी असूनही हा मांजा बाजारात कसा पोहोचतो, याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
लखनौतील घटनेनंतर सरकारची तातडीची कारवाई
बुधवारी लखनौमध्ये एका वैद्यकीय प्रतिनिधीचा चायनीज मांज्यामुळे गळा चिरला जाऊन मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली होती. या घटनेनंतर राज्य सरकारने तातडीने दखल घेत कठोर निर्णय जाहीर केले. ही घटना अपवाद नसून, अशा अनेक घटना यापूर्वीही घडल्यामुळे सरकारने आता शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली आहे.
बेकायदेशीर मांजा व्यापाराला चाप बसणार
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की,चायनीज मांजाच्या बेकायदेशीर व्यापारात सहभागी असलेल्या संपूर्ण नेटवर्कची ओळख पटवावी. विक्रेते, पुरवठादार आणि वापरकर्त्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत. दोषींना अटक करून तुरुंगात पाठवावे. बंदी असूनही मांजाची विक्री किंवा वापर केल्यास तो गंभीर गुन्हा मानला जाईल आणि कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले
चायनीज मांजामुळे, दुचाकीस्वार, पादचारी, लहान मुले,पक्षी व प्राणी यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होत असल्याने, हा निर्णय नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

