महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
ढेबेवाडी प्रतिनिधी : ढेबेवाडी-सळवे मार्गावरील बनपुरी गावाजवळ मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार १६ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या दरम्यान ढेबेवाडीकडून सळवे गावाच्या दिशेने जाणारी ॲक्टिव्हा दुचाकी (क्र. MH 43 AP 8439) आणि समोरून ढेबेवाडीकडे येणारी महिंद्रा पिकअप (क्र. MH 50 N 1755) यांची बनपुरी गावाजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली.
धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.अपघातातील मृत युवकाचे नाव सूरज दिपक कुंभार (वय १६, रा. सळवे, ता. पाटण) असे आहे. सूरज हा ढेबेवाडीकडून आपल्या सळवे गावाकडे परतत असताना हा अपघात घडल्याचे समजते.अपघाताची माहिती मिळताच ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दाईंगडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा व प्राथमिक तपास सुरू केला.
पोलीसांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.या दुर्दैवी घटनेची वार्ता समजताच सळवे व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. अल्पवयीन मुलाच्या अकाली निधनामुळे गावात शोककळा पसरली असून कुंभार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणाची सायंकाळपर्यंत ढेबेवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

