महिलेचे बनावट अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या दोन आरोपींना बेड्या; ४ मोबाईल व ६ सिमकार्ड जप्त

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

७ मे २०२६

फलटण : सोशल मीडियावर बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करून एका महिलेचे मॉर्फ केलेले आक्षेपार्ह व अश्लील फोटो, व्हिडिओ आणि संदेश प्रसारित करून तिची व तिच्या पतीची बदनामी करणाऱ्या दोन आरोपींना फलटण शहर पोलीसांनी अटक केली आहे. या कारवाईत गुन्ह्यात वापरलेले ४ मोबाईल हँडसेट, ६ सिमकार्ड असा सुमारे ₹२३,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ७८, ७९, ३५६(२) तसेच माहिती व तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(सी), ६७ आणि ६७(ए) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर सिमकार्ड मिळवून त्याचा वापर करून इन्स्टाग्रामवर अनेक बनावट अकाऊंट तयार केले. या अकाऊंटद्वारे संबंधित महिलेचे मॉर्फ केलेले अश्लील व आक्षेपार्ह फोटो आणि संदेश तयार करून ते इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जवळपास सहा महिन्यांपासून प्रसारित केले जात होते. त्यामुळे पीडित महिला आणि तिच्या पतीला मानसिक त्रास व सामाजिक बदनामीला सामोरे जावे लागत होते.

या प्रकरणाचा तांत्रिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. तपास पथकाने आरोपीने वापरलेले मोबाईल क्रमांक आणि बनावट इन्स्टाग्राम आयडींचा मागोवा घेतला. त्यानंतर प्रमोद सनद कांबळे (वय ३२), रा. लक्ष्मीनगर, फलटण याला ताब्यात घेण्यात आले.चौकशीत त्याने हा गुन्हा सुनिल बाळू मोहिते (वय ३४), रा. वाठार निंबाळकर, ता. फलटण यांच्या मदतीने केल्याचे उघड झाले.

तपासात असेही निष्पन्न झाले की, सुनिल मोहिते हा व्ही आय (Vi) कंपनीचा सिमकार्ड विक्रेता असून त्याने दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने सिमकार्ड उपलब्ध करून दिले आणि ते कार्यान्वित करून आरोपी प्रमोद कांबळे याच्या ताब्यात दिले. त्याच सिमकार्डचा वापर करून बनावट सोशल मीडिया अकाऊंट तयार करण्यात आले.

पोलीसांनी दोन्ही आरोपींना अटक करून गुन्ह्यात वापरलेले ४ मोबाईल हँडसेट आणि ६ सिमकार्ड जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या पथकात सहायक पोलीस निरीक्षक मिटू जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे तसेच बापूराव धायगुडे, जितेंद्र टिके, स्वप्नील खराडे, निखील गायकवाड, गणेश अवघडे, जयदीप यादव आणि अतुल बडे यांनी सहभाग घेतला.

error: Content is protected !!