महावितरण कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्ये यांच्या बदलीनंतर कार्यालयासमोर फटाके; सुजाण नागरिकांकडून तीव्र नाराजी

फटाके वाजवणे संस्कृती की विकृती ?

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण : फलटण विभागीय महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्ये यांच्या बदलीचे आदेश जाहीर होताच शहरातील काही व्यक्तींनी महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केल्याची घटना घडली. मात्र या प्रकारामुळे शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, “फटाके वाजवणे ही संस्कृती की विकृती?” असा प्रश्न सुजाण नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शासकीय सेवेमध्ये बदली ही एक नियमित प्रशासकीय प्रक्रिया मानली जाते. एखाद्या अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीबाबत मतभेद असू शकतात, काही निर्णयांबाबत नाराजी असू शकते; परंतु त्याच्या बदलीचे जाहीरपणे सेलिब्रेशन करून फटाके फोडणे ही सुसंस्कृत समाजाची ओळख नसल्याचे मत विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.महावितरणसारख्या महत्त्वाच्या विभागात कार्यरत असताना कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्ये यांनी वीजपुरवठा व्यवस्थापन, थकबाकी वसुली, वीजचोरीविरोधातील कारवाया, नवीन वीज जोडण्या आणि विविध विकासकामांमध्ये प्रशासनाच्या धोरणांनुसार काम केले.

त्यांच्या काही निर्णयांमुळे काही घटक नाराज झाले असतील, मात्र त्यामुळे त्यांच्या बदलीचे सार्वजनिक स्वागत करणे योग्य ठरत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.स्थानिक नागरिकांच्या मते, लोकशाही व्यवस्थेत कोणत्याही अधिकाऱ्याविषयी नाराजी व्यक्त करण्यासाठी कायदेशीर आणि लोकशाही मार्ग उपलब्ध आहेत.

तक्रारी, निवेदने, आंदोलने किंवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रश्न मांडता येतात. मात्र फटाके फोडून एखाद्या व्यक्तीच्या बदलीचा आनंद साजरा करणे ही वैयक्तिक द्वेषाची भावना दर्शवणारी बाब आहे. अशा घटनांमुळे प्रशासनात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता असते.

विशेष म्हणजे, महावितरणसारख्या विभागातील अधिकारी अनेकदा नियमांची कठोर अंमलबजावणी करत असतात. थकबाकीदारांवर कारवाई, अनधिकृत वीजवापराविरोधातील मोहिमा आणि महसूल वसुलीसाठी घेतलेले निर्णय काहींना अप्रिय वाटू शकतात. त्यामुळे एखाद्या अधिकाऱ्याच्या बदलीनंतर काही जणांनी व्यक्त केलेला आनंद हा संपूर्ण समाजाची भावना मानता येणार नाही, असेही जाणकारांचे मत आहे.

शहरातील काही सामाजिक संघटनांनी या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे. “अडचणीच्या काळात अधिकाऱ्यांच्या मदतीने कामे करून घ्यायची आणि काम झाल्यानंतर त्याच अधिकाऱ्याचा सार्वजनिक अवमान करायचा, ही प्रवृत्ती समाजासाठी घातक आहे,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.

मतभेद असले तरी व्यक्तीचा सन्मान राखणे हीच खरी लोकशाही संस्कृती असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

बदलीबाबत प्रकाशगड येथूनही स्पष्टीकरण

दरम्यान, मुंबईतील ‘प्रकाशगड’ येथील महावितरण कंपनीच्या मानव संसाधन (एचआर) विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्ये यांच्या बदलीबाबत कोणतीही तक्रार, चौकशी किंवा विशेष कारण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

महावितरणच्या सर्वसाधारण बदली धोरणानुसार एकाच ठिकाणी तीन वर्षे पूर्ण झालेल्या वर्ग-१ आणि वर्ग-२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या केल्या जातात. त्याच धोरणानुसार ग्रामोपाध्ये यांची बदली करण्यात आली असून, त्याबाबतचे कारणही आदेशात नमूद करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या स्पष्टीकरणामुळे बदलीमागे कोणतेही वादग्रस्त कारण नसल्याचे स्पष्ट होत असतानाच, बदलीचे कारण न समजून घेत काही व्यक्तींनी आम्हीच बदली केली असे दाखवत केलेल्या फटाकेबाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे “फटाके वाजवणे ही संस्कृती की विकृती?” हा प्रश्न आता फलटणच्या सामाजिक आणि सार्वजनिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, या घटनेची चर्चा फलटण तालुक्यासह राज्यभर सुरू असून, सुसंस्कृत आणि पुरोगामी म्हणून ओळख असलेल्या फलटणच्या प्रतिमेला अशा घटनांमुळे तडा जाऊ नये, अशी अपेक्षा सुजाण नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. कोणत्याही अधिकाऱ्याच्या कामाचे मूल्यमापन त्याच्या कार्यकाळातील कार्यावर व्हावे, बदलीनंतर फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांवर नव्हे, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

फाटके वाजवणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात कारवाई होणार का?

सार्वजनिक ठिकाणी परवानगीशिवाय फटाके फोडणे, ध्वनीप्रदूषण करणे किंवा सार्वजनिक शांतता भंग होईल असे कृत्य केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. ध्वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, स्थानिक प्रशासनाचे आदेश तसेच भारतीय न्याय संहितेतील लागू तरतुदींनुसार पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार आहे.

महावितरण कडून तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांची ओळख पटवून चौकशी केली जाऊ शकते. नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाई, गुन्हा नोंदविणे किंवा अन्य कायदेशीर पावले उचलली जाऊ शकतात अशी माहिती शहर पोलिसांनी दिली आहे.

नागरिकांचा सवाल

“सामान्य नागरिकांनी नियम मोडल्यास कारवाई होते, मग शासकीय कार्यालयासमोर फटाके फोडणाऱ्यांवरही समान निकष लागू होणार का?”

error: Content is protected !!