महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण : प्रेमाच्या जाळ्यात ओढून खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत हॉटेल व्यावसायिकाकडून कोट्यवधींची खंडणी उकळणाऱ्या सराईत टोळीला फलटण शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत जेरबंद करून मोठी कामगिरी बजावली आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन अनोळखी आरोपी आणि एका महिलेचा शोध सुरू आहे.
दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी फिर्यादी आनंद काशिनाथ दळवी (रा. कापुरहोळ, ता. भोर, जि. पुणे) यांना फलटण येथील एका महिलेने मोबाईलवरून व्हॉट्सअॅप कॉल करून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. अश्लील संभाषण करून दि. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.१५ वाजता बुधवार पेठ, फलटण येथील एका फ्लॅटवर बोलावून घेतले.तेथे कट रचून आरोपींनी फिर्यादी आनंद काशिनाथ दळवी यांना “तुला खोट्या बलात्कार प्रकरणात अडकवतो” अशी धमकी देत शिवीगाळ व मारहाण केली.
त्यानंतर आरोपी साहिल, वैभव, रोहन, विनायक, राजू बोके तसेच दोन अनोळखी व्यक्ती आणि एका महिलेनं संगनमत करून फिर्यादीकडून ४० लाख रुपयांची खंडणी मागितली.या टोळीने फिर्यादीकडून जबरदस्तीने १ लाख ९५ हजार रुपये रोख, एटीएम व क्रेडिट कार्डद्वारे वसूल केले. त्यानंतर पुणे रस्त्याने सोडण्याच्या बहाण्याने नेत असताना दोन अनोळखी इसमांनी रस्त्यात गाडी अडवून मारहाण करत गळ्यातील सुमारे २० तोळे वजनाची (सुमारे ३० लाख रुपये किंमतीची) सोन्याची चैन जबरदस्तीने काढून घेतली.
या घटनेबाबत फिर्यादी आनंद काशिनाथ दळवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून फलटण शहर पोलिस ठाण्यात गु.र.नं. ४४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८ (५), ३०८ (६), ३०९ (६), १२६, ६१(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी विशेष पथके तयार करून तपास सुरू केला असता 1. साहिल रवि तारे (रा. दत्तनगर, फलटण)2. वैभव बाळासो सस्ते (रा. सस्तेवाडी, ता. फलटण)3. रोहन नवीन काकडे (रा. मंगळवारपेठ, फलटण)4. विनायक बाळासो जाधव (रा. ठाकुरकी, ता. फलटण)5. राज राम बोके (रा. मंगळवारपेठ, ता. फलटण, जि. सातारा)तपासा दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली असून ईतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती वैशाली कड्डुकर, उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद काळे, सहायक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे, पोलिस उपनिरीक्षक दिनेश शिंदे तसेच पोलिस अंमलदार नानासो होले, नितीन सजगणे, संतोष नाळे, जितेंद्र टिके, काकासो कर्णे, अतुल बडे, मुकेश घोरपडे, महेश जगदाळे, निखील गायकवाड, जयदीप यादव, गणेश अवघडे, विक्रम कुंभार यांनी ही कारवाई केली.
गुन्ह्याचा अधिक तपास सुरू असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे करत असून, फरार आरोपी आणि चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.

