
महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण प्रतिनिधी: फलटण शहरात अतिक्रमण विरोधी मोहिम सुरू करण्यात आली असून मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी थेट ॲक्शन मोडमध्ये येत सुपर मार्केट परिसरातील अनधिकृत अतिक्रमणे हटवण्याची कारवाई केली आहे. शहरातील प्रमुख व्यापारी व वर्दळीच्या सुपर मार्केट भागात असलेल्या बेकायदेशीर फेरीवाले, अनधिकृत दुकाने, हातगाड्या तसेच पथदिवे, फुटपाथ व रस्त्यांवर अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे हटवण्यात आली.
सुपर मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. नागरिकांना चालताना त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी नगरपालिका प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभाग, नगररचना विभाग व नगरपालिका कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे.
कारवाईदरम्यान अनेक हातगाड्या तात्पुरती दुकाने व फलक काढून टाकण्यात आले. काही व्यापाऱ्यांना नोटिसा बजावून भविष्यात अतिक्रमण न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच पुन्हा अतिक्रमण केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सांगितले की, “फलटण शहर सुस्थितीत व स्वच्छ ठेवण्यासाठी अतिक्रमण हटवणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत राहण्यासाठी ही मोहीम पुढेही सुरू राहणार आहे.”नागरिकांनीही प्रशासनाच्या या मोहिमेला सहकार्य करावे व नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
संपूर्ण शहरातील अतिक्रमणे हटवण्याची मागणी
फलटण शहरात सुपर मार्केट परिसरातील अतिक्रमण हटवण्याची कारवाई झाल्यानंतर नागरिकांनी संपूर्ण शहरातील अनधिकृत अतिक्रमणे हटवण्याची जोरदार मागणी केली आहे. शहरातील अनेक भागातील मुख्य रस्ते, बाजारपेठ, फुटपाथ, सार्वजनिक जागा आणि चौकात असलेल्या बेकायदेशीर हातगाड्या, दुकाने व बांधकामांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाने शहरभर विशेष मोहीम राबवून अतिक्रमण हटवावे तसेच पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांच्यातून करण्यात येत आहे.
अतिक्रमण मोहीम थांबणार की सुरू राहणार
फलटण शहरात सुपर मार्केट परिसरातील अतिक्रमण हटवण्याची कारवाई झाल्यानंतर नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे, ही अतिक्रमण मोहीम पुढे सुरू राहणार की थांबणार? शहरातील अनेक भागात अजूनही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे असून नागरिकांना वाहतूक, स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांबाबत त्रास होत आहे.काही नागरिकांनी प्रशासनाच्या कारवाईचे स्वागत केले असून संपूर्ण शहरात नियमितपणे अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे.
तर काही व्यापाऱ्यांनी अचानक कारवाई केल्याने नुकसान झाल्याचे सांगत प्रशासनाने पुनर्वसन व पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.नगरपालिका प्रशासनाकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम टप्प्याटप्प्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले असून नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

