महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क
सातारा | प्रतिनिधी
फलटण नगर परिषदेच्या कर विभागामध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पाच सदस्यीय जिल्हास्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाबाबत विविध समाजमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या गंभीर बातम्या आणि त्यानंतरही मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्याकडून चौकशी अहवाल सादर न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी संतोष चंद्रकांत पाटील यांनी २८ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, यापूर्वी ११ जुलै २०२६ रोजी फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव त्यांच्या स्तरावर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कागदपत्रे, दस्तऐवज व डिजिटल पुरावे सुरक्षित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
मात्र अद्यापपर्यंत कोणताही चौकशी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त न झाल्याने जिल्हास्तरीय समिती नेमण्यात आली.समितीच्या अध्यक्षपदी जिल्हा सहआयुक्त (नगर परिषद प्रशासन शाखा) अभिजीत सतीश बापट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदस्य म्हणून जिल्हा कोषागार अधिकारी आरती बबन नांगरे, जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी (खर्च) सितल योगेश करंजेकर, नगर परिषद प्रशासन शाखेचे अधीक्षक अक्षय छगन माने तसेच लेखापाल व लेखापरीक्षक विशाल मुगुटराव इथापे यांचा समावेश आहे.
या समितीला फलटण नगर परिषदेच्या कर विभागातील कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून शक्य तितक्या लवकर तपशीलवार अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे फलटण नगर परिषदेतील कर विभागातील कथित गैरव्यवहाराची चौकशी आता जिल्हास्तरावर होणार असून संबंधित प्रकरणातील जबाबदारी निश्चित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुख्याधिकारी निखिल जाधव यांचीही चौकशी होण्याची शक्यता
जिल्हाधिकारी कार्यालयाने मुख्याधिकारी निखिल जाधव यांना प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र निर्धारित कालावधीत अहवाल सादर न झाल्याने आता जिल्हास्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. त्यामुळे या चौकशीदरम्यान फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या भूमिकेचीही तपासणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

