फलटण नगरपरिषद मध्ये मुश्ताकअहमद महात यांना भावनिक निरोप; विशेष सन्मानसोहळा पडला पार

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण (प्रतिनिधी) : फलटण नगरपरिषद येथे कर्मचारी तथा उपमुख्याधिकारी म्हणून प्रदीर्घ काळ जबाबदारी सांभाळणारे मुश्ताकअहमद अब्दुललतिफ महात (महात साहेब) काल शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनिमित्त नगरपरिषद सभागृहात भावपूर्ण सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी निखिल जाधव होते. त्यांनी महात साहेबांना स्वतःच्या खुर्चीवर बसवून विशेष सन्मान करत त्यांच्या दीर्घ व निष्ठावंत सेवेला सलाम केला. “महात साहेबांनी प्रशासनात समन्वय, शिस्त आणि मानवी दृष्टिकोन यांचा उत्कृष्ट संगम साधला. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला कायम प्रेरणादायी राहील,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनीही महात साहेबांच्या कार्यकाळातील अनेक आठवणींना उजाळा देत त्यांचा यथोचित सन्मान केला. नगरपरिषदेतील कठीण प्रसंग, विविध विकासकामांतील त्यांचे योगदान आणि कर्मचाऱ्यांशी जपलेले स्नेहबंध यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.आई-वडिलांच्या उपस्थितीत निवृत्तीचा सन्मानमहात साहेबांच्या सेवाजिवनातील एक हृदयस्पर्शी क्षण यावेळी अनुभवायला मिळाला.

ज्या आई-वडिलांच्या समोर त्यांनी शासकीय सेवेत रुजू होताना पहिले पाऊल टाकले होते, त्याच आई-वडिलांच्या उपस्थितीत त्यांनी निवृत्तीचा सत्कार स्वीकारला. हा क्षण उपस्थितांसाठीही अत्यंत भावनिक ठरला. महात साहेब व त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. कार्यक्रमाला त्यांची नातवंडेही उपस्थित होती, त्यामुळे वातावरण अधिकच भावुक झाले.

कर्मचाऱ्यांकडून कृतज्ञता व्यक्त

नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात साहेबांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या मनोगतातून त्यांच्या संयमी, कर्तव्यदक्ष आणि सर्वसमावेशक कार्यशैलीचे कौतुक केले. प्रशासनाचा कारभार सुरळीत ठेवताना त्यांनी दाखवलेली कार्यतत्परता, निर्णय क्षमतेतील ठामपणा आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती यांचा विशेष उल्लेख झाला.

दीर्घ सेवेला सलाम

महात साहेबांच्या निवृत्तीमुळे नगरपरिषदेतील एक अनुभवी व समर्पित अधिकारी कार्यमुक्त झाला असला, तरी त्यांच्या कार्याची छाप प्रशासनात कायम राहील, अशी भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली. त्यांच्या मार्गदर्शनातून तयार झालेली कार्यसंस्कृती आणि शिस्त भविष्यातही नगरपरिषदेच्या कामकाजात प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

समारोप प्रसंगी महात साहेबांनीही सर्वांचे आभार मानत, “फलटण नगरपरिषद हेच माझे कुटुंब राहिले. सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळेच मी ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू शकलो,” असे भावनिक शब्दांत सांगितले.

error: Content is protected !!