मलठण प्रभाग क्रमांक ५ मध्ये विकासकामांचा धडाका; कोट्यवधींच्या कामांना उत्साहात प्रारंभ

महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क

फलटण : शहरातील मलठण येथील प्रभाग क्रमांक ५ मध्ये नागरी सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी विविध विकासकामांचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. रस्ते काँक्रीटीकरण, तसेच लघुदाब व उच्चदाब विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासारख्या अत्यावश्यक कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या कामांमुळे परिसरातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत होऊन नागरिकांच्या दैनंदिन जीवनात मोठा सकारात्मक बदल होणार आहे.या कार्यक्रमास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे पाटील, युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर आणि ज्येष्ठ विधीतज्ञ अॅड. नरसिंह निकम यांची विशेष उपस्थिती होती.स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ नगरसेवक अशोकराव जाधव यांनी प्रास्ताविक करताना प्रभागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, उघड्या विद्युत तारांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत होता, तसेच पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था होऊन चिखल व पाण्याचा त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर हाती घेतलेली ही विकासकामे अत्यंत महत्त्वाची असून, ती वेळेत पूर्ण होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, या विकासकामांमध्ये प्रभागातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, जलनिस्सारण व्यवस्था सुधारणा, तसेच विद्युत यंत्रणेचे आधुनिकीकरण यांचा समावेश असून भविष्यात या भागात आणखी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

आमदार सचिन पाटील म्हणाले की, या विकासकामांच्या प्रारंभामुळे मलठण प्रभाग क्रमांक ५ मध्ये समाधानाचे वातावरण असून, “आता आपल्या भागाचा चेहरामोहरा बदलणार” अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. आगामी काळात ही कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास साधला जाईल.

लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, भूमिगत विद्युत वाहिन्यांमुळे वीजपुरवठा अधिक सुरक्षित, अखंड आणि विश्वासार्ह होईल. वारंवार होणारे अपघात, शॉर्टसर्किटच्या घटना आणि विजेच्या खंडित पुरवठ्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होतील. त्याचप्रमाणे रस्त्यांच्या काँक्रीटीकरणामुळे पावसाळ्यातील चिखल, खड्डे आणि वाहतुकीतील अडथळे कायमचे दूर होतील, ज्याचा थेट फायदा नागरिकांना तसेच स्थानिक व्यावसायिकांना होणार आहे.

कार्यक्रमाला नगरसेवक रोहित नागटिळे, किरण राऊत, राहुल निंबाळकर, सचिन अहिवळे, अमित भोईटे, तसेच नगरसेविका सौ. कांचन दत्तराज व्हटकर उपस्थित होत्या. याशिवाय माजी नगरसेवक अनुप शहा, सुरेश पवार, तेजसिंह भोसले, अमोल सस्ते, प्रतापसिंह नाईक निंबाळकर, भाजप नेते बजरंग गावडे आणि फलटण शहरातील इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शेवटी नगरसेवक रोहित नागटिळे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी व नागरिकांचे आभार मानले.

error: Content is protected !!